Chinchwad crime News : दोन मटका अड्डे आणि बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर कारवाई

7 लाख 36 हजार 327 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – एमआयडीसी भोसरी आणि शिरगाव परिसरात सुरु असलेल्या दोन जुगार अड्ड्यावर तसेच चिखली परिसरात अवैधरित्या दारू विक्री होणा-या एका हॉटेलवर पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा मारून कारवाई केली. त्यात एकूण 7 लाख 36 हजार 327 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भोसरीकडून टेल्कोकडे जाणाऱ्या रोडलगत असणाऱ्या सपना टी स्टॉलच्या समोर मोकळ्या जागेत मटका अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार मंगळवारी (दि. 5) पथकाने छापा मारून कारवाई केली.

कारवाईमध्ये 7 हजार 520 रुपयांची रोकड, 11 हजारांचे मोबाईल असा 18 हजार 520 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. या प्रकरणी मोहम्मद दस्तगीर शाह (वय 44, रा . बालाजीनगर झोपडपट्टी , भोसरी) याच्यासह त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुस-या कारवाईमध्ये शिरगाव परंदवडी पोलीस चौकीच्या हद्दीत संत तुकाराम महाराज ऊस कारखान्याजवळ मटका सुरु असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून मटका चालवणा-या अविनाश चंद्रकांत सुर्यवंशी (वय 28, रा. शिरगाव, ता . मावळ) याला अटक केली. त्याच्याकडून 15 हजार 30 रुपये रोख रक्कम, 40 हजार 100 रुपये किमतीचे 10 मोबाईल व इतर साहित्य असा 55 हजार 185 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाईमध्ये चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत ज्योतीबा मंदिर ते सोनावणे वस्तीकडे जाणा-या रोडलगत समाधान हॉटेलमध्ये बेकायदा दारूविक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी (दि. 6) रात्री नऊच्या सुमारास पथकाने छापा मारला. बेकायदा दारूविक्री होत असल्याचे या कारवाईत निदर्शनास झाले.

या प्रकरणी प्रविण विलास मलवर (वय 28 रा.पद्मावतीनगर, चिंबळी) याला अटक करण्यात आली. हॉटेलमधून 44 हजार 940 रुपयांची रोकड, 37 हजार 682 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारुच्या व बियरच्या वेगवेगळया कंपनीच्या बॉटल, 5 लाख 80 हजार किमतीची स्विफ्ट कार असा 6 लाख 62 हजार 622 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तिन्ही कारवाईमध्ये एकूण 7 लाख 36 हजार 327 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.