Chinchwad Crime News : अवैधरित्या चालणाऱ्या नऊ दारू अड्ड्यांवर कारवाई; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

एमपीसी न्यूज – शहरात अवैधरित्या सुरु असलेल्या दारु विक्री आणि दारु तयार करण्याच्या नऊ ठिकाणांवर पोलिसांनी छापेमारी करत एक लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात 12 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चाकण पोलिसांनी कुरुळी गावात एका व्यक्तीवर कारवाई करून त्याच्याकडून 12 हजार 744 रुपयांचा देशी, विदेशी दारूसाठा जप्त केला.

शिरगाव पोलिसांनी चांदखेड गावात ओढ्याजवळ सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर कारवाई केली. त्यात पोलिसांनी एकावर कारवाई करत 50 हजारांचे गुळ मिश्रित कच्चे रसायन जप्त केले. तर सामाजिक सुरक्षा विभागाने मावळ गेट व्हेज नॉनव्हेज फॅमिली रेस्टोरंट या हॉटेलमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या दारू विक्रीप्रकरणी कारवाई केली. त्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी हवालदार वस्ती, मोशी येथे इंद्रायणी नदीच्या काठावर सुरु असलेल्या एका दारूभट्टीवर छापा मारून 22 हजार 300 रुपयांचे कच्चे रसायन, हातभट्टी दारू आणि लाकडी सरपण जप्त केले. एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी गंधर्वनगरी, मोशी येथे एका तरुणावर कारवाई करत त्याच्याकडून 8 हजार 778 रुपयांच्या देशी, विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथकाने नढे नगर, काळेवाडी येथे दोघांवर कारवाई करत 23 हजार 400 रुपयांची दारू जप्त केली. वाकड पोलिसांनी देखील दोघांवर कारवाई करत 11 हजार 810 रुपयाची बिअर आणि व्हिस्की जप्त केली.

आळंदी जवळ केळगाव येथे राजमुद्रा ज्यूस बार लॉज या हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाने धाड टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून पोलिसांनी 41 हजार 92 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. कोणताही परवाना न घेता आरोपी त्यांच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे दारू विक्री करत होते. आळंदी पोलिसांनी एका व्यक्तीकडून एक हजार 914 रुपयांचा देशी, विदेशी दारूसाठा जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.