Chinchwad Crime News : खंडणी विरोधी पथक कासारवाडीतून वाकडमध्ये स्थलांतरित

वाकड चौकीच्या दोन खोल्यांमध्ये कामकाज सुरू

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक नाशिक फाटा येथून वाकडमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. वाकड-हिंजवडी उड्डाणपूलाखाली असलेल्या वाकड चौकीच्या दोन खोल्यांमध्ये पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर खंडणी विरोधी पथक आणि दरोडा प्रतिबंधक विभाग वेगळे केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्यावर दरोडा विरोधी पथक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्यावर खंडणी विरोधी पथकाची जबाबदार सोपविण्यात आली.

आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दोन विभाग स्वतंत्र केले. मात्र, कित्येक दिवस या दोन्ही विभागाचे कामकाज नाशिक फाटा येथील एकाच इमारतीतून सुरू होते. दरम्यानच्या काळात दोन्ही विभागांना काम करताना अडचणी येत होत्या. त्यामुळे खंडणी विरोधी पथक वाकड येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार नुकतेच वाकड-हिंजवडी उड्डाणपुलाखाली चौकीच्या दोन खोल्यांमध्ये पथकाचे कामकाज सुरू करण्यात आले. खंडणी विरोधी पथकाच्या कामाचा आवाका पाहता येथील जागा देखील कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खंडणी विरोधी पथकासाठी महापालिकेने प्रशस्त जागा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ म्हणाले, “पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या सूचनेनुसार भयमुक्त शहर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पथक कोठून काम करते यापेक्षा काय काम करते हे महत्वाचे आहे. खंडणी संबंधीच्या काही तक्रारी किंवा माथाडीच्या नावाखाली कोणी धमकावत असल्यास नागरिकांनी कसलीही भीती न बाळगता संपर्क साधावा.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.