Chinchwad Crime News : भेसळयुक्त डिझेल विकणारी टोळी भोसरी पोलिसांच्या जाळ्यात; 37 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – भेसळयुक्त डिझेल विकणाऱ्या टोळीला भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यात भेसळयुक्त डिझेलचा पुरवठादार, डिझेल विक्री करणारा डीलर, दोन सब डीलर आणि दोन ग्राहक अशा सहा जणांचा समावेश आहे. या टोळीकडून दोन टँकर, एक पिकअप असा एकूण 37 लाख 15 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुरवठादार कैलाश पंजाबी, डीलर सुधीर बागलाने, सबडीलर ऋषिकेश सतीश कदम, रोहन शशिकांत हडपे, ग्राहक शहनवाज नजीर बेग, शौकत नजीर बेग अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 एप्रिल रोजी भोसरी पोलिसांना माहिती मिळाली की, भोसरी येथील लांडगे नाट्यगृहाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात भेसळयुक्त डिझेलची विक्री केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी रात्री साडेआठ वाजता मैदानात जाऊन खात्री केली असता तिथे भेसळयुक्त डिझेलची विक्री सुरु होती. तिथून पोलिसांनी एक पिकअप, दोन आयबीसी टँकर, ऑईल विक्रीचे रीडिंग दाखवणारी मशीन, डिझेल मोजण्याचे साधन असा एकूण सात लाख 75 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यात पोलिसांनी ऋषिकेश आणि रोहन या दोघांना अटक केली.

अटक केलेल्या आरोपींकडून चौकशीदरम्यान माहिती मिळाली की, भेसळयुक्त डिझेल त्यांनी सुधीर बागलाने याच्याकडून आणले आहे. त्याने केलेला डिझेलचा साठा देखील आरोपींनी पोलिसांना दाखवला. त्यानुसार पोलिसांनी बागलाने याला अटक करून त्याच्याकडून दोन तंकर, 20 हजार लिटर भेसळयुक्त डिझेल असा 29 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

बागलाने याच्याकडे चौकशी करून त्याला भेसळयुक्त डिझेलचा पुरवठा करणारा मुख्य डीलर कैलाश पंजाबी याला देखील पोलिसांनी अटक केली. तसेच दोन ग्राहकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीकडून एकूण 37 लाख 15 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.