Chinchwad crime News : एटीएम कार्डचे क्लोनिंग करून बिहार, झारखंडमधून पैसे काढणारी टोळी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

0

एमपीसी न्यूज – हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेलेल्या ग्राहकांच्या एटीएम कार्डचे क्लोनिंग करून त्या माहितीच्या आधारे नागरिकांच्या बँक खात्यातून हजारो रुपये काढून घेणारी आंतरराज्यीय टोळी पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. भोसरी आणि वाकड येथील दोन प्रकरणातील चार आरोपींना सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

निखिल पाटील (वय 23, रा. देवास, मध्यप्रदेश), खालिद अन्सारी (वय 27, रा. धानोरी गावठाण. मूळ रा. टटकजोरी, करंजो देवघर, झारखंड) अशी भोसरीच्या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.

उमेश आन्वेकर यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या बँक खात्यातून बिहार येथून पैसे काढून घेतले जात असल्याचे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास करत फिर्यादी आन्वेकर जेवणासाठी गेलेल्या लांडेवाडी भोसरी येथील एका हॉटेलमधून वेटर निखिल याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने फिर्यादी यांच्या डेबिट कार्डची माहिती खालिद याला दिल्याचे सांगितले. खालिद याने ती माहिती बिहार येथील त्याच्या अन्य साथीदारांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांच्या साथीदारांनी क्लोन डेबिट कार्ड बनवून आन्वेकर यांच्या बँक खात्यातून 50 हजार रुपये काढले होते.

वाकड येथेही असाच प्रकार घडला. फिर्यादी आकाश खोकर यांच्या बँक खात्यातून 15 हजार 900 रुपये झारखंड येथून काढून घेतल्याचा प्रकार समोर आल्याने खोकर यांनी पोलिसात धाव घेत फिर्याद दिली.

या प्रकरणात देखील सायबर पोलिसांनी सद्दाम हुसेन (वय 29), फुरकान अन्सारी (वय 32, दोघे रा. विशालनगर, पिंपळे निलख. मूळ रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. हे दोघेही विशालनगर येथील एका रेस्टोरंट आणि बारमध्ये काम करत होते.

ताब्यात घेतलेल्या दोघांकडून पोलिसांनी तीन डेबिट कार्ड स्किमर, एक लॅपटॉप, एक पेनड्राईव जप्त केला. दोन्ही प्रकरणात चार आरोपींनी सुमारे 500 डेबिट कार्डचा डेटा चोरला असल्याचा संशय पोलिसांना आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे, सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, अंमलदार अतुल लोखंडे, भास्कर भारती, नितेश बिचेवार यांच्या पथकाने केली.

कार्ड क्लोन होऊ नये म्हणून सायबर सेलचे नागरिकांना आवाहन

# हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल, दुकान किंवा इतर पीओएस असणा-या ठिकाणी आपले डेबिट / क्रेडिट कार्ड आपल्या समोरच स्वाईप करण्याची मागणी करा. नजरेआड कार्ड स्वाईप होऊ देऊ नका.

# एटीएम सेंटरमध्ये जाऊन आपले कार्ड वापरण्यापूर्वी तिथे एखादा कार्ड स्किमिंग स्लॉट लावला आहे का, याची खात्री करा.

# पीओएस असेल किंवा एटीएम सेंटरमध्ये आपला पिन दाखल करताना संबंधित मशीनचा की बोर्ड एका हाताने झाकून घ्या, ज्यामुळे आपला पिन क्रमांक गोपनीय राहील.

# आपल्या कार्डद्वारे बिल पे करण्यासाठी ते इतरांच्या ताब्यात देऊन त्यांना कार्डचा पिन सांगू नका.

# हॉटेल मालकांनी आपल्याकडे काम करणा-या वेटरवर लक्ष ठेवावे, ज्यामुळे ते बेकायदेशीर कृत्यात सहभागी होणार नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.