Chinchwad Crime News : कामावर जाणाऱ्यांना गाठून लुटणा-यांना गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – कामावर जाणाऱ्या लोकांना एकट्याने गाठून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आठ जणांना दोन वेगळ्या कारवायांमध्ये गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन्ही कारवायांमध्ये सहा लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पहिल्या कारवाई हृतिक युवराज माने (वय 19), राहुल अर्जुन मोरे (वय 19, दोघेही रा. तापकीर चौक, नढेनगर, काळेवाडी), रमेश शंकराप्पा राठोड (रा. ज्ञानेश्वर कॉलनी, काळेवाडी) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, कामावर जाणाऱ्या पादचारी नागरिकांना एकट्याने गाठून त्यांना कोयत्याचा धाक दाखवून दोघेजण लूटमार करत असल्याची माहिती पोलीस शिपाई ओंबासे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता निगडी, चिखली, चिंचवड एमआयडीसी भोसरी, दिघी, चाकण, हिंजवडी आणि वाकड परिसरात 25 गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच, पादचाऱ्यांचे हिसकावलेले मोबाईल आरोपी राठोड याला विकल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी राठोडला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी 25 मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण चार लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुसऱ्या कारवाईत राहुल आपापसाहेब लोहार (वय 21), हृतिक प्रकाश गायकवाड (वय 20), विजय बाबासाहेब साळवे (वय 19), तुषार बापू टिंगरे (वय 20), अजय आकाश कांबळे (वय 19, सर्व रा. मोशी) यांच्यासह अन्य एका अल्पवयीन मुलास अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेचे पथक हद्दीत गस्त घालत असताना सहायक फौजदार आवटे यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हिंजवडी, निगडी, भोसरी, चिखली परिसरात पादचाऱ्यांना लुटल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन लाख 21 हजारांचे मोबाईल आणि दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कारवाईत एकूण सहा लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, सहायक निरीक्षक सिद्धनाथ बाबर, कर्मचारी धर्मराज आवटे, दादा पवार, नारायण जाधव, प्रवीण दळे, संजय गवारे, आदिनाथ मिसाळ, रोहिदास आडे, तुषार शेटे, मोहंमदगौस नदाफ, वासुदेव मुंडे, सुनील गुट्टे, सुरेश जायभाये, प्रशांत सैद, तुषार काळे, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, आदिनाथ ओंबासे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.