Chinchwad Crime News : ‘कोरोना रुग्णवाहिका, शववाहिका, अंत्यसंस्कारप्रकरणी लूट करणाऱ्यांवर खंडणी, फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार’

पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांचा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांना स्मशानभूमीत नेताना शववाहिका आणि अंत्यसंस्कार करताना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केल्यास संबंधितांवर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी याबाबत मंगळवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत माहिती दिली.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, “काहीजण ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांच्या नावाने रुग्णवाहिका चालवत आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून सुरू केलेल्या सेवेतून काहीजण रुग्णांकडून वारेमापपणे पैसे लुटत आहेत. यातून त्यांच्या संस्थांची देखील बदनामी होत आहे. पुणे जिल्ह्यात रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे पैसे घेणे संबंधितांना बंधनकारक आहे.

मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने तीन संस्थांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे न घेता अंत्यसंस्कार केले जात आहेत. संबंधित संस्थांना महापालिका ठराविक रक्कम देत आहे. असे असतानाही काहीजण मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.

ग्रामीण भागात ठराविक सिलेंडरचे पैसे रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतले जातात. ग्रामपंचायत स्तरावर काही सुविधा मोफत उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने जिल्हा परिषदेकडून ग्रामीण भागात काही सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तर काहींसाठी रुग्णांना पैसे द्यावे लागत आहेत. वरील तिन्ही सेवेत संबंधित लोक रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा तक्रारी येत आहेत. अशा लोकांवर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

अगोदरच नागरिक लॉकडाऊन, काम बंद झाल्याने तसेच कोरोनामुळे त्रस्त झाले आहेत. त्यांना अजून त्रास देणे चुकीचे आहे. कोणाच्या बाबतीत लुटीचा प्रकार घडत असेल तर नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. तिथे सेवा अॅपमध्ये माहिती भरावी. त्यानंतरही तक्रार न घेतल्यास त्याची नियंत्रण कक्षाला माहिती मिळेल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.

नागरिकांना पोलीस ठाण्यात तसेच समाजात वावरताना कोरोना परिस्थितीशी संबंधित काही समस्या आल्यास थेट संपर्क (9134424242 / 9529691966) करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.

रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक –

1 : रुग्णवाहिका प्रकार – मारुती
25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 500 रुपये
पराती किलोमीटरसाठी दर – 11 रुपये
प्रति प्रतीक्षा तास – 100 रुपये

2 : रुग्णवाहिका प्रकार – टाटा सुमो, मेटाडोर इत्यादी सदृश कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका
25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 600 रुपये
पराती किलोमीटरसाठी दर – 12 रुपये
प्रति प्रतीक्षा तास – 125 रुपये

3 : रुग्णवाहिका प्रकार – टाटा 407, स्वराज मझदा इत्यादी चॅसीसवर बांधणी केलेली रुग्णवाहिका
25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 900 रुपये
पराती किलोमीटरसाठी दर – 13 रुपये
प्रति प्रतीक्षा तास – 150 रुपये

_MPC_DIR_MPU_II

रुग्णवाहिका चालक-मालक यांच्यासाठी अटी आणि शर्ती –

# वरील भाडेदर संपूर्ण पुणे जिल्हयासाठी लागू आहेत.

# वरील भाडेदर रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या अंतरासाठी आहेत. 25 किलोमीटरच्या पुढे अंतर गेल्यास प्रति तास प्रमाणे भाडे वाढ होईल. प्रतिक्षादर लागू राहतील.

# हे दरपत्रक रुग्णवाहिकेत आतील बाजूस प्रदर्शित करण्यात यावे.

# वाहन प्रवास न करता उभे असल्यास प्रत्येक तासाकरीता प्रतिक्षा दर लागू राहतील.

# प्रस्तावीत केलेल्या कमाल भाडयापेक्षा जास्त भाडे आकारात येणार नाही.

# रुग्णवाहीकला जीपीएस प्रणाली असणे आवश्यक आहे.

# प्रत्येक फेरी नंतर रुग्णवाहिकेचे निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे.

# मोटार वाहन कायदा व त्यातील तरतुदीनुसार वेळोवेळी लागू होणारे नियम व अटी लागू राहतील.

# सर्व रुग्णवाहिका वातानुकूलित असल्याचे ग्राहय आहे. तसेच आवश्यकतेनुसार किंवा रुग्णाच्या विनंतीनुसार वातानुकूलित यंत्रणा चालू अथवा बंद ठेवता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.