Chinchwad Crime News : पिस्तूल विक्री करणाऱ्या चौघांना अटक; चार पिस्तूल, आठ काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – मध्य प्रदेश येथून पिस्तूल आणून पिंपरी-चिंचवड आणि अकोला जिल्ह्यात विक्री करणाऱ्या एका टोळीचा पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट चारने पर्दाफाश केला आहे. टोळीतील चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

रवींद्र सुधाकर औटे (वय 34, रा. रासेगाव, ता. खेड), प्रवीण बळीराम उगले (वय 36, रा. आळंदी), मंगलदास उर्फ मुन्ना रुपलाल धूत (वय 35, रा. नवीन वस्ती, कुरणखेड काटेपुर्णा, ता. जि. अकोला), अनिल जामसिंग ससोडे (वय 35, रा. जामने, ता. खकनार, जि. बु-हाणपूर, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस शिपाई गोविंद चव्हाण, धनाजी शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सुरुवातीला रवींद्र आणि प्रवीण या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून विक्रीसाठी आणलेले एक गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त केले. त्यावरून आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी आणखी तीन पिस्तूल आणि सात काडतुसे लपवून ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी चार पिस्तूल आणि आठ काडतुसे असा दोन लाख आठ हजारांचा शस्त्रसाठा जप्त केला.

आरोपींनी ही शस्त्रे अकोला येथील एका मित्राच्या मदतीने मध्यप्रदेश येथून आणली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट चारचे एक पथक थेट मध्य प्रदेशात रवाना झाले. पोलिसांनी अगोदर अकोला येथील मित्र आरोपी मंगलदास याला अटक केली. त्यानंतर बुऱ्हाणपूर मधील आरोपी अनिल याला अटक केली.

आरोपी अनिल ससोदे याचा मित्र रॉबिंग सिंग उर्फ गुलाबसिंग उर्फ अप्पू ससोदे हा खकनार, बुऱ्हाणपूर येथील जंगलात पिस्तूल बनवतो. त्याच्या मागावर पोलीस असल्याचे त्याला समजताच तो पळून गेला. आरोपी प्रवीण याच्यावर जबरी चोरी, मारामारीचे सहा गुन्हे दाखल आहेत. आरोपी रवींद्र याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक गुन्हा दाखल आहे. आरोपी मंगलदास याच्यावर अकोला जिल्ह्यातील पातूर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यात तो जामिनावर बाहेर आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.