Chinchwad crime News : वाहनांची तोडफोड करून नागरिकांना लुटणा-या ‘त्या’ 15 जणांवर दरोड्याचे चार गुन्हे

एमपीसी न्यूज – मोहननगर, चिंचवड येथे टोळक्याने वाहनांची तोडफोड करत परिसरात राडा घातला. तसेच वाहन धारक नागरिकांना जबरदस्तीने मारहाण करत लुटले. याबाबत लूटमार आणि राडा घालणा-या 15 जणांवर दरोड्याचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दीपक गिरी, युवराज काळे, आशिष गोरखा, ऋषिकेश शिंदे, बाळासाहेब गवळी, प्रमोद बनगर, रोहित देशमुख, आकाश गायकवाड, अक्षय लोंढे, घनश्याम साळुंखे, आशिष कांबळे, अरविंद उर्फ सोन्या काळे, करण ससाणे, सुबोध ढवळे आणि त्याचा साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राहूल बबन अलंकार (वय 34, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी त्यांची स्कूल व्हॅन (एम एच 14 / सी डब्ल्यू 0686) उभी केलेल्या ठिकाणी पाहायला गेले असता आरोपिंनी त्यांना धक्काबुक्की करत त्यांच्या खिशातून एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर अलंकार यांच्या स्कूल व्हॅनच्या काचा फोडून नुकसान केले.

याच आरोपींच्या विरोधात दुसरी फिर्याद संतराम अर्जुन जगताप (वय 51, रा. मोहननगर चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जगताप त्यांची कार (एम एच 02 / बी डी 4633) मोहननगर येथे पार्क करण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत हप्ता देण्याची मागणी केली.

तसेच ‘आज 31 डिसेंबर आहे. आम्हाला पार्टीसाठी पैसे पाहिजेत’ असे म्हणत जगताप यांच्या गाडीतील सामान काढून घेतले. जगताप यांच्याही कारच्या काचा फोडून आरोपींनी नुकसान केले.

तिसरी फिर्याद पप्पूलाल सय्यद शेख (वय 41, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीत म्हटले आहे की, शेख त्यांच्या रिक्षामध्ये (एम एच 14 / सी यु 1922) असताना आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून त्यांना थांबवले.

त्यांच्याशी झटापट करून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने व्यवसायाचे 740 रुपये काढून घेतले. एका आरोपीने शेख यांच्या रिक्षाच्या काचा कोयत्याने फोडून नुकसान केले.

चौथी फिर्याद बापू अण्णा अलंकार (वय 60, रा. मोहननगर, चिंचवड) यांनी दिली आहे. त्यानुसार, अलंकार त्याच्या विंगर गाडीतून (एम एच 14 / सी सी 7806) त्यांच्या मुलाचा लॅपटॉप काढत होते. त्यावेळी आरोपींनी लॅपटॉप हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला.

फिर्यादी यांनी आरोपींना प्रतिकार केला. तरीही आरोपींनी लॅपटॉप हिसकावून घेतला. कोयत्याचा धाक दाखवून आरडा ओरडा केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांची विंगर आणि ओमानी गाडीची तोडफोड करून नुकसान केले.

तोडफोड, दरोडा, राडा हा प्रकार गुरुवारी (दि. 31) रात्री दहा ते शुक्रवारी (दि. 1) रात्री सव्वा बारा पर्यंत सुरु होता. पिंपरी-चिंचवड पोलिसांची नवीन वर्षाची सुरुवात या दरोड्याच्या घटनेने झाली आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदी अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आल्याने परिसरात मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला. काही वेळेसाठी मोहननगर परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.