Chinchwad Crime News : ऑक्टोबर महिन्यात दररोज चार वाहने चोरीला; वाहन चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

एमपीसी न्यूज – ऑक्टोबर महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज सरासरी चार वाहने चोरीला गेली आहेत. महिन्याभरात तब्बल 125 पेक्षा अधिक वाहन चोरीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील वाहनचोर सुसाट सुटले आहेत. तर पोलीस मात्र गुन्हे दाखल करण्यापलीकडे काहीही करत नसल्याचे चित्र आहे. वाहन चोरटे पोलिसांपुढे आव्हान निर्माण करत आहेत.

जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 या तीन महिन्यांमध्ये 200 वाहने चोरीला गेली. सप्टेंबर महिन्यात वाहन चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात हैदोस घातला. एका सप्टेंबर महिन्यात तब्बल 123 वाहने चोरीला गेली आहेत. त्याच आकड्याच्या जवळपास ऑक्टोबर महिन्यात वाहने चोरीला गेली आहेत. जेसीबी, डंपर, कार, बुलेट, पल्सर यांसह तब्बल 125 पेक्षा अधिक वाहने ऑक्टोबर महिन्यात चोरीला गेली आहेत.

जानेवारी ते ऑक्टोबर 2020 या दहा महिन्यांच्या कालावधीत शहरातून 750 वाहने चोरीला गेली आहेत. हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत वाहनचोरीच्या घटना कमी असल्या तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण देखील मागील वर्षीच्या तुलनेत अतिशय कमीच आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड पोलिसांना केवळ 95 वाहनांचा शोध लागला आहे. उर्वरित 532 वाहने कुठे गेली, याबाबत कुणाला काहीच सांगता येत नाही. ऑक्टोबर महिन्यात जप्त केलेल्या वाहनांची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही.

वाहनचोरी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न – एसीपी राजाराम पाटील

गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील म्हणाले, “वाहन चोरी रोखण्यासाठी गुन्हे शाखांना विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. रेकोर्डवरील गुन्हेगारांची देखील झाडाझडती सुरु आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.