Chinchwad Crime News : गहुंजे येथील क्रिकेट बेटिंग प्रकरणाची आंतरराष्ट्रीय बुकींशी लिंक ?

37 जणांना अटक; आणखी 25 आरोपी निष्पन्न

एमपीसी न्यूज – गहुंजे येथे 26 मार्च रोजी झालेल्या भारत-इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेणा-या टोळीला तीन ठिकाणाहून पोलिसांनी पकडले. अटक केलेले आरोपी विविध राज्यातील असून त्यांचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु असून आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी 37 जणांना अटक केली आहे. तसेच आणखी 25 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्याची कारवाई सुरु आहे.

चेतन जगदीश डावर (वय 27, रा. हिवरेनगर, नागपूर), बिपीनकुमार मणिलाल तन्ना (वय 52, रा. वर्सोवा पोलीस स्टेशन समोर, अंधेरी वेस्ट, मुंबई), राहुल अजय साखला (वय 27, रा. अंधेरी वेस्ट, मुंबई), अजय वसंत शहा (वय 44, रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई) या चार जणांना 29 मार्च रोजी अटक केली आहे.

तर कार्तिक राजकुमार चावला (वय 28, रा. पटेलनगर, नवी दिल्ली), गोविंद राजेश मणिहार (वय 31, रा. नागपूर), गौरव हरीश वाघवा (वय 30, रा. सोनीपथ, हरियाणा), रेमंड सामुअल कयादो (वय 21, रा. गोवा), अमित सुभाष चौधरी (वय 25, रा. इंदोर, मध्यप्रदेश) आणि अन्य 28 जणांना पोलिसांनी 27 मार्च रोजी अटक केली आहे.

पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 मार्च रोजी भारत-इंग्लंड क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर भोपाळ येथील मुख्य बुकी भोलू आणि नागपूर येथील मुख्य बुकी चेतन उर्फ सोनु डावर यांच्यासाठी आरोपींनी पुण्यातील विविध भागातून ऑनलाईन माध्यमातून बेटिंग घेतली.

याबाबत वाकड पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मामुर्डी येथील एका बांधकाम साईटवर, घोरावडेश्वर डोंगरावर तसेच विमाननगर येथील एका हॉटेलवर कारवाई करून 33 जणांना अटक केली. पोलीस कारवाईसाठी गेले असता आरोपींनी पोलिसांना धक्काबुक्की करून मुक्कामार देऊन दुखापत केली. तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला.

याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात 45 लाख 37 हजार 400 रुपयांचे 75 मोबाईल फोन, तीन लॅपटॉप, अत्याधुनिक कॅमेरे, दुर्बिणी, रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.

_MPC_DIR_MPU_II

कोरोना साथ सुरु असल्याने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामने प्रेक्षकांशिवाय खेळविण्यात आले. मैदानात प्रेक्षक नसल्याने सर्व क्रिकेट प्रेमी टीव्ही आणि ऑनलाईन माध्यमातून क्रिकेट सामने पाहत होते. प्रत्यक्ष क्रिकेट सामना आणि त्याचे प्रक्षेपण यामध्ये सुमारे सहा मिनिटांचे अंतर असते. या अंतराचा फायदा घेऊन आरोपी त्यांच्या वेगवेगळ्या अॅप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे बेटिंग घेत होते.

बेटिंग ॲप्लिकेशन तयार करणारे आणि त्यावर बेटिंग घेणारे यांचा एक गट असतो. तर प्रत्यक्षात सर्वसामान्य क्रीडाप्रेमी पैसे लावतात त्यांचा एक गट असतो. बेटिंग घेणा-या लोकांची एक टीम क्रिकेटच्या प्रत्यक्ष सामन्यावर लक्ष ठेऊन असते. तिथे घडणा-या घडामोडीनुसार त्यांच्या ॲप्लिकेशन मधील सर्व व्यवहार बदलतात आणि बेटिंग घेणा-या गटाला मोठा आर्थिक फायदा होतो. तर सर्वसामान्य नागरिक पैसे हरतात.

भारतात बेटिंग ॲप्लिकेशन बेकायदेशीर आहे. असे असताना हे आरोपी गहुंजे येथील स्टेडियमच्या बाजूला असलेल्या एका उंच इमारतीमध्ये आणि डोंगरावर बसले. तिथून ही मंडळी अत्याधुनिक कॅमे-यातून क्रिकेट सामना पाहून त्याद्वारे त्यांच्या बेटिंग ॲपमधील आर्थिक गणिते फिरवत होते.

आरोपींचा एक गट गहुंजे स्टेडियमच्या बाजूला असलेल्या एका उंच इमारतीत, एक गट घोरावडेश्वर डोंगरावर थांबून सामन्यावर लक्ष ठेऊन होता. तर एक गट पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून यावर नियंत्रण ठेवत होता.

या प्रकरणात एकूण 13 ॲप वापरले गेले असून त्यातील एका ॲपच्या मालक व डेव्हलपरला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुंबई आणि नागपूर येथील दोन मुख्य बुकींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

या प्रकरणाचे धागेदोरे नागपूर, मुंबई, दिल्ली, हरियाणा, जयपूर, गोवा या शहरातील बूकिंपर्यंत पोहोचले आहेत. देशभरातील अन्य महत्वाच्या शहरातील बुकींची देखील नावे तपासात समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, उमेश लोंढे, हरीश माने, उपनिरीक्षक नंदकुमार कदम यांच्या पथकाने केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.