Chinchwad Crime News : प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी चोरले तब्बल 26 स्मार्ट फोन

एमपीसी न्यूज – प्रेसिसीला इम्प्रेस करण्यासाठी ठराविक कालावधीनंतर मोबाईल फोन बदलून द्यायचा. तिच्याकडून अगोदरच मोबाईल फोन घेऊन तो विकायचा, असा सपाटा लावलेल्या दोन चोरट्यांना दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सागर मोहन सावळे (वय 22, रा. अष्टविनायक चौक, मोरेवस्ती, चिखली), निलेश देवानंद भालेराव (वय 19, रा. नेवाळे वस्ती, घरकुल, चिखली) अशी अटक केलेल्या चोरट्यांनी नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना माहिती मिळाली की, भोसरी पीएमटी बस स्टॉप समोरील पुलाच्या खाली दोघेजण दुचाकीवरून (एम एच 14 / एच बी 3909) येणार आहेत. ते दोघेजण पायी चालत जाणा-या लोकांचे मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावतात. या माहितीनुसार, पोलिसांनी पीएमटी बस स्टॉपजवळ सहा तास सापळा लावून आरोपी सागर आणि निलेश यांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे आठ मोबाईल फोन आणि एक दुचाकी मिळून आली. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करत त्यांच्याकडे कसून चौकशी केली. त्यात पोलिसांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे 26 स्मार्ट फोन आणि तीन दुचाकी असा एकूण 4 लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

आरोपी सागर आणि निलेश यांच्या प्रेयसी असलेल्या तरुणींना स्मार्टफोनचे आकर्षण होते. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ठराविक दिवसांच्या अंतराने दोघेही प्रेयसींना वेगळा मोबाईल फोन वापरण्यासाठी देत असत. प्रेयसीकडे पहिला मोबाईल फोन द्यायचा आणि दुसरा मोबाईल फोन चोरायचा. त्यानंतर चोरलेला दुसरा मोबाईल फोन प्रेयसीला वापरायला द्यायचा आणि तिच्याकडून पहिला मोबाईल काढून घ्यायचा. काढून घेतलेला पहिला मोबाईल फोन विकायचा आणि त्यातून आलेल्या पैशांवर मौजमजा करायची. असा सपाटा या दोघांनी मागील काही महिन्यांपासून लावला होता. त्यांनी तब्बल 26 स्मार्टफोन तसेच तीन दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या कारवाईमुळे पिंपरी तीन, एमआयडीसी भोसरी दोन, भोसरी तीन आणि शिरवळ पोलीस ठाण्यातील एक असे एकूण नऊ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, उपनिरीक्षक मंगेश भांगे, अंमलदार महेश खांडे, राजेंद्र शिंदे, उमेश पुलगम, राहुल खारगे, विक्रांत गायकवाड, नितीन लोखंडे, आशिष बनकर, सागर शेडगे, प्रवीण माने, राजेश कौशल्ये, गणेश कोकणे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.