Chinchwad crime News : शहरात अवैध धंदे जोमात; सामाजिक सुरक्षा विभागाचे 17 दिवसात 10 अवैध धंद्यांवर छापे

एमपीसी न्यूज- पिंपरी-चिंचवड शहरात अवैध धंदे आयुक्तांच्या आदेशानंतर देखील जोमात आहेत. पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने मागील 17 दिवसात शहरातील नऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहा ठिकाणी छापे मारले आहेत. पोलीस आयुक्तांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात हे प्रकार उघडकीस येत असल्याने आयुक्तांच्या आदेशाला थेट केराची टोपली दाखवल्याचे चित्र दिसत आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे सर्व पोलीस निरीक्षकांना आदेश दिले. मात्र, त्या आदेशाला पोलीस निरीक्षकांनी हवे तेवढे गांभीर्याने घेतले नाही.

आयुक्तांच्या आदेशानंतर देखील शहरात जुगार, मटका, वेश्या व्यवसाय असे अवैध धंदे राजरोसपणे सुरुच आहेत. या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे आणि प्रसाद गोकुळे यांच्या नेतृत्वाखाली एक सामाजिक सुरक्षा पथकाची सुरुवात केली.

सामाजिक सुरक्षा पथकाने 17 दिवसात नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहा ठिकाणी अवैध धंद्यांवर छापा टाकला. या छाप्यांमध्ये एकूण 155 आरोपींवर गुन्हे दाखल करीत त्यांना अटक केली.

तर वाकड येथे एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा टाकून दोन तरुणींची सुटका केली. या पथकाने आत्तापर्यंत चार लाख 75 हजार 406 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शहरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळते. पण स्थानिक पोलिसांना माहिती मिळत नाही. यामागचे काय गौडबंगाल आहे.

माहिती मिळत असूनही कारवाई करण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ तर केली जात नाही ना, असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची आयुक्त कशी दखल घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाने केलेली कामगिरी

# 26 सप्टेंबर – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे

मटका अड्ड्यावर छापा मारून 71 हजार 140 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 29 सप्टेंबर – वाकड पोलीस ठाणे-

वेश्‍या व्यवसाय सुरु असणा-या हॉटेलवर छापा मारत दोन तरुणींची सुटका केली. यात 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 1 ऑक्‍टोबर – चिंचवड पोलीस ठाणे

अवैध दारू विक्री करणा-या दुकानावर कारवाई केली यात 25 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर 44 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 2 ऑक्‍टोबर – देहूरोड पोलीस ठाणे

अवैध दारू विक्री करणा-या दुकानावर छापा मारून 41 हजार 930 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 4 ऑक्‍टोबर – हिंजवडी पोलीस ठाणे

जुगार अड्ड्यावर छापा मारून 1 लाख 28 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 24 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 5 ऑक्‍टोबर – निगडी पोलीस ठाणे

मटका अड्ड्यावर छापा मारून 41 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 13 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 6 ऑक्‍टोबर – सांगवी पोलीस ठाणे

मटका अड्ड्यावर छापा मारून 36 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 8 ऑक्‍टोबर – भोसरी पोलीस ठाणे

मटका अड्ड्यावर छापा मारून 35 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 12 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 10 ऑक्‍टोबर – सांगवी पोलीस ठाणे

मटका अड्ड्यावर छापा मारून 31 हजार 966 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 7 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

# 12 ऑक्‍टोबर – पिंपरी पोलीस ठाणे

मटका अड्ड्यावर छापा मारून 54 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 19 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.