Chinchwad Crime News : शहरातील अवैध धंदे जोमात; ऑक्टोबरमध्ये सामाजिक सुरक्षा पथकाचे 18 अवैध धंद्यांवर छापे

एमपीसी न्यूज – अवैध धंद्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मोहीम उघडली आहे. त्यांतर्गत पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे शाखा तसेच सामाजिक सुरक्षा पथकाच्या माध्यमातून शहरातील अवैध धंदे आणि गुन्हेगारांवर कारवाई केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात सामाजिक सुरक्षा पथकाने पिंपरी-चिंचवड शहरातील 18 ठिकाणच्या अवैध धंद्यांवर छापे मारले आहेत. यामध्ये 35 लाख 27 हजार 389 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलाची धुरा हाती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील व्हाईट कॉलर गुंड आणि गुन्हेगारांना सज्जड दम देत शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी झिरो टॉलरंस ही मोहीम उघडली. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाची स्थापना करण्यात आली. आयुक्तालय सुरु झाल्यानंतर दोन वर्षांनी या पथकाची सुरुवात करण्यात आली.

सामाजिक सुरक्षा पथकाने देखील सुरुवातीपासून आपल्या कामगिरीचा आलेख मागील महिन्याभरात चढताच ठेवला आहे. या पथकाने शहरातील 9 जुगार अड्डे, अवैधरित्या दारू विक्री करणा-या तीन हॉटेल, पाच दारू भट्ट्या आणि एका वेश्या व्यवसाय करणा-या हॉटेलवर छापेमारी करत 122 जणांवर गुन्हे दाखल केले.

तळेगाव एमआयडीसी परिसरात एका हॉटेलवर सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा मारून सामाजिक सुरक्षा पथकाने दोन तरुणींची सुटका केली. त्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. तरीही अवैध धंदे बंद न झाल्याचे चित्र सामाजिक सुरक्षा पथकाने केलेल्या कारवायांवरून दिसत आहे. सामाजिक सुरक्षा पथकाला अवैध धंद्यांची माहिती मिळू शकते तर स्थानिक पोलिसांना अवैध धंद्यांची माहिती का मिळत नाही? माहिती मिळत असूनही जाणीवपूर्वक कारवाई केली जात नाही का? असाही यानिमित्ताने प्रश्न उपस्थित केला जात आहे.

नदीकाठच्या गावांमध्ये अवैधरीत्या दारूभट्ट्या लावल्या जात आहेत. हजारो लिटर दारू त्या भट्ट्यांमध्ये तयार केली जात आहे. मात्र स्थानिक पोलिसांना त्याचा गंधही येत नाही.

सप्टेंबर महिन्यात सामाजिक सुरक्षा पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, पिंपरी, चिंचवड, सांगवी, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी दोन तर निगडी, देहूरोड, तळेगाव एमआयडीसी, हिंजवडी, भोसरी पोलीस ठाणे, शिरगाव चौकी, म्हाळुंगे चौकीच्या हद्दीत प्रत्येकी एका धंद्यावर छापे मारले आहेत. तर तळेगाव, चिखली, भोसरी एमआयडीसी, दिघी आणि आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकही छापा मारण्यात आलेला नाही. पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरु केली असली तरीही शहरातील अवैध धंदे अजूनही जोमात असल्याचे दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.