Chikhali Crime News : निगडी, चिखली परिसरात पावणेचार लाखांच्या गुटख्यासह 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. 23) निगडी आणि चिखली पोलीस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करून अवैधरित्या तंबाखुजन्य गुटख्याची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करणा-यांवर कारवाई केली. या कारवायांमध्ये पोलिसांनी तीन लाख 70 हजार 534 रुपयांच्या गुटख्यासह एकूण 13 लाख पाच हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निगडी परिसरात बुधवारी (दि. 23) अवैध गुटख्याची साठवणूक आणि दुचाकी (एम एच 14 / एफएच 3112) वरून वाहतूक केली जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कारवाई केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी एक लाख 45 हजार 650 रुपयांचा गुटखा आणि नऊ लाख 35 हजारांची दोन कार, एक दुचाकी अशी तीन वाहने जप्त केली.

याप्रकरणी अतुल दिलीप छाझेड (वय 35, रा. यमुनानगर, निगडी), नितीन हिरालाल छाझेड (वय 55, रा. दत्तवाडी, आकुर्डी, निगडी) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 328, 272, 273, 188, 34 नुसार निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळवडे परिसरात दोन ठिकाणी गुटख्याची साठवणूक आणि विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी कारवाई करून दोन लाख 24 हजार 884 रुपयांचा गुटखा आणि एक हजार 900 रुपये रोख रक्कम जप्त केली.

याप्रकरणी सचिन मोहनराव भापकर (वय 35, रा. ज्योतिबा नगर, तळवडे), मांगिलाल कृपाराम सोळंकी (वय 40, रा. रुपीनगर, तळवडे) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 328, 272, 273, 188, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही कारवायांमध्ये एकूण 13 लाख पाच हजार 534 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे पथकातील उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, पोलीस अंगलदार विजय कांबळे, संतोष बर्गे, सुनिल शिरसाट, नितीन लोंढे, अनिल महाजन, संगिता जाधव, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, जालिंदर गारे, सोनाली माने यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.