Chinchwad Crime News : ‘ती लाच नव्हतीच, ते पैसे मला यासाठी दिले….’; वाहतूक पोलीस महिलेचा वरिष्ठांकडे लेखी खुलासा

एमपीसी न्यूज – ‘तरुणीने माझ्या खिशात ठेवलेले पैसे लाच घेतल्याचे नाहीत. तर त्या तरुणीला वस्तू खरेदी करण्यासाठी मी पैसे दिले होते. ते पैसे तिने मला परत केले आहेत’ असा लेखी खुलासा ‘त्या’ निलंबित वाहतूक पोलीस महिलेने वरिष्ठांकडे केला आहे.

पिंपरी मधील एका चौकात वाहतुकीचे नियमन करत असताना एका वाहतूक पोलीस महिलेने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतल्याचा व्हिडीओ शहरात चर्चेचा विषय बनला. त्याबाबत वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली असून कसुरी अहवाल सादर केल्यानंतर गुरुवारी रात्री संबंधित वाहतूक पोलीस महिलेचे निलंबन करण्यात आले. दरम्यान त्या वाहतूक पोलीस महिलेने लेखी खुलासा दिला असून त्यात तिने लाच घेतली नसल्याचे म्हटले आहे.

स्वाती सीताराम सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलीस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत.

सोन्नर आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलीस मंगळवारी (दि. 15) पिंपरी मधील साई चौकात कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान तिथे एका मोपेड दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित वाहतूक पोलीस महिलेने त्यांना सांगितले.

ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याची तोड निघाली आणि त्या वाहतूक पोलीस महिलेने अनोख्या पद्धतीने ती रक्कम स्वीकारली. एका तरुणीने चक्क वाहतूक पोलीस महिलेच्या खिशात पैसे ठेवले आणि पोलीस महिलेने ते स्वीकारले असल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ जाऊन पोहोचला आणि नंतर कारवाईची प्रक्रिया सुरु झाली. सहाय्यक आयुक्तांनी याबाबत कसुरी अहवाल उपायुक्तांकडे सादर केला. त्यावर निर्णय घेत सोन्नर यांचे निलंबन करण्यात आले.

दरम्यान सोन्नर यांनी वरिष्ठांकडे याबाबत लेखी खुलासा केला आहे. त्यात म्हटले आहे की, “व्हिडीओमध्ये दिसणारी तरुणी माझ्या ओळखीची आहे. तिने एक वस्तू घेतली होती. त्यावेळी ते पैसे मी दिले होते. माझे पैसे मला परत करण्यासाठी ती तरुणी आली होती. तिने मला पैसे परत दिले आहेत.”

व्हिडीओ लिंक
https://www.youtube.com/watch?v=Ia5jM-s76AI&feature=youtu.be

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.