Chinchwad Crime News : पिंपरी चिंचवड ते बीड पाठलाग करून अपहृत व्यक्तीची केली सुटका; पाच जणांना अटक

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनची कारवाई

एमपीसी न्यूज – आर्थिक वादातून पाच जणांनी मिळून टेलरिंगचे काम करणाऱ्या एकाचे चिंचवडमधून अपहरण केले. अपहरण करून या टेलरला बीड येथे घेऊन जात असताना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी सलग आठ तास आरोपींचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्या तावडीतून अपहरण झालेल्या टेलरची सुटका केली.

गहीनीनाथ बबन कडवकर (वय 32, रा. बाळापुर, पोटारा, ता. जि. बिड), अनिल धनराज तांदळे (वय 32, रा. अंबिल वडगाव, पो. पोथरा, ता.जि. बिड), भाऊराव लहू तांदळे (वय 37), हनुमंत बन्सी पायाळ (वय 45, दोघे रा. अंबिल वडगाव, पो.पोथरा, ता.जि.बिड), बाळु ज्ञानोबा तांदळे (वय 23, रा. तांदळयाचीवाडी, पो. येळमघाट, ता.जि.बिड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

राजेंद्र बन्सी वाघमारे (वय 34, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) असे अपहरण आणि सुटका झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

राजेंद्र वाघमारे हे चिंचवड परिसरात टेलरिंगचे काम करतात. त्यांचे वाल्हेकरवाडी येथे विनोद टेलर्स नावाचे दुकान आहे. त्यांनी आरोपींकडून मागील काही दिवसांपूर्वी कर्ज घेतले होते. त्यावरून आरोपींनी त्यांचे मंगळवारी (दि. 3) सकाळी आठ वाजताच्या सुमारास बोलेरो कार (एम एच 25 / आर 2243) मधून अपहरण केले.

याबाबत पिंपरी चिंचवड पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानुसार चिंचवड पोलिसांसोबत गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेंद्र यांच्या पत्नी पार्वती वाघमारे यांनी पैशांच्या वादातून बीड येथील काही जणांनी राजेंद्र यांचे अपहरण केल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला.

त्यानुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांना तपासादरम्यान एका आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यानुसार त्याला ट्रॅक करून पोलिसांनी आरोपींचा पाठलाग सुरू केला. सलग आठ तास पाठलाग केल्यानंतर बीड जिल्हयातील नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आरोपींची कार पोलिसांना आढळली.

आरोपींच्या कारला ओव्हरटेक करून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. हा प्रकार आपण पैशांच्या देवाण-घेवाणीवरून केला असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. आरोपींना चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक एस. डी. निलपत्रेवार, पोलीस अंमलदार जयवंत राऊत, नामदेव राऊत, नामदेव कापसे, सायबर क्राईमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल नाईक, पोलीस अंमलदार नागेश माळी यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.