Chinchwad Crime News : कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून परस्पर विक्री; 6 आरोपी जेरबंद, 16 कार जप्त

एमपीसी न्यूज – कार भाड्याने देण्याचे अमिष दाखवून कारची परस्पर विक्री करणा-या 6 जणांना चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याजवळून 1 कोटी 20 लाख 20 हजार किंमतीच्या सोळा कार जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी संबंधितांना कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून त्याची परस्पर विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले होते.

कल्पेश अनिल पंगेकर (वय 33, रा. नवी खडकी, येरवडा), नमन सहाणी (वय 39, रा. लोहगाव, पुणे), सनी भाऊसाहेब कांबळे (वय 27, रा. खडकी -पुणे), संदिप ज्ञानेश्वर गुंजाळ (वय 37, रा. लक्ष्मीनगर, येरवडा), हितेश ईश्वर चंडालिया (वय 27, रा. जय जवाननगर, येरवडा) व रोनित मधुकर कदम (वय 28, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हौ. सोसायटी, येरवडा), अशी अटक आरोपींची नावे आहेत.

यातील दोन आरोपींना 30 मे रोजी तर, इतर चार आरोपींना 1 जून रोजी अटक करण्यात आली.

याप्रकरणी सुनिल नामदेव राखपसरे (रा. चिंचवड, पुणे ) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कल्पेश पंगेकर व नमन सहाणी हे फिर्यादी यांची कार भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून घेऊन गेले होते. त्यानंतर चार महिने कार फिर्यादी यांना दाखवली नाही, तसेच कारचे भाडेही दिले नाही.

त्यावरून फिर्यादी यांनी आरोपींना फोन करून कारबाबत विचारणा केली असता त्यांना शिवीगाळ करत धमकी देण्यात आली. आरोपींनी इतर अनेकांची अशीच फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादी यांनी 19 मे रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी दाखल फिर्यादीवरून पोलिसांनी तपास सुरू करत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. आरोपींनी कार मालकासोबत कार विकत घेणा-या लोकांची देखील फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याजवळून 1 कोटी 20 लाख 20 हजार किंमतीच्या सोळा कार जप्त करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.