Chinchwad crime News : चिंचवड, म्हाळुंगे परिसरातील दोन गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील सुरज उर्फ ससा वाघमारे आणि म्हाळुंगे येथील संतोष मांजरे टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अपर पोलीस आयुक्त रमानाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. 16) याबाबतचे आदेश दिले आहेत.

टोळीप्रमुख सुरज उर्फ ससा राजू वाघमारे (वय 24), स्वप्नील सिद्राम माडेकर (वय 23), राजा सिद्राम माडेकर (सर्व रा. आनंदनगर, चिंचवड) यांच्यासह अन्य एका अल्पवयीन आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ससा वाघमारे टोळीतील सदस्य हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, अवैध शस्त्र वापरणे यासारखे एकूण 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्याच्या जोरावर आरोपी परिसरात दहशत पसरवत होते. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता.

तसेच, चाकण येथील टोळीप्रमुख संतोष मधुकर मांजरे (वय 30, रा.कोरेगाव खुर्द, खेड, पुणे), आकाश उर्फ गणेश रवी उर्फ रवींद्र धर्माळे (वय 19), ऋषिकेश उर्फ गोट्या सुनील भालेराव (वय 20), गौरव गजानन मुळे (वय 20) अक्षय अशोक शिवळे (वय 25), दीपक बाळू पिंजन (वय 25), वैभव उर्फ सोन्या अरुण खोंडगे (वय 22, सर्व रा. म्हाळुंगे, खेड), विनोद उर्फ सोन्या गणेश पवार (वय 19, रा. रा. शेलू, खेड), अभिषेक बुद्धसेन पांडे (वय 19, रा. खालूंब्रे, खेड), अनिल शांताराम शिंदे (वय 22, रा. आंबोली, खेड), ऋषिकेश बाळू रोकडे (रा. भांबोली, खेड), सौरभ सोनवणे (रा. बिड) यांच्यावरही मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरे टोळीतील सदस्यांवर खून, दरोडा, जबरी चोरी, विनयभंग, खंडणीसाठी दुखापत, अवैध शस्त्र बाळगणे असे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यांमुळे आरोपींची परिसरात दहशत पसरली होती. गुन्ह्यांच्या जोरावर आरोपी स्वतःचा आर्थिक फायदा करवून घेत होते. त्यामुळे त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला. या दोन्ही प्रस्तावाला मंजुरी देत अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

उपायुक्त सुधीर हिरेमठ, उपायुक्त मंचक इप्पर, सहायक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, म्हाळुंगेचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद पवार, चिंचवडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, पोलीस कर्मचारी सचिन चव्हाण यांनी ही कारवाई केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.