Chinchwad Crime News : खुनी हल्ला झालेल्या सराईत गुन्हेगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज – एका सराईत गुन्हेगारावर मोहननगर, चिंचवड येथे 10 एप्रिल रोजी खूनी हल्ला झाला होता. त्याचा रविवारी (दि. 25) उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्याच्यावर झालेल्या हल्ल्यात आणखी काही आरोपी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा, अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली. यामुळे रुग्णालयात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आकाश शिवाजी सरगर (वय 27, रा. दातेरी चाळ, मोहननगर, चिंचवड) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

शुभम गणेश राठोड (वय 20), मयुर बाळासाहेब पानसरे (वय 22, दोघेही रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) आणि शिवाजी माधव काळे (वय 22, रा. चिखली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एका अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत आकाश सरगर याच्यावर दोन विनयभंगाचे गुन्हे, हाताने मारहाण, जबरी चोरी, शस्त्राने मारहाण करणे, असे गुन्हे दाखल आहेत. त्याला 2017 मध्ये एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. सरगर याच्यावर 10 एप्रिल रोजी मोहननगर, चिंचवड येथे खूनी हल्ला झाला होता. तेव्हापासून त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र रविवारी सकाळी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सरगर याच्यावर हल्ला करण्यात आणखी काहीजण असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा. अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी नातेवाइकांची समजूत काढल्यानंतर त्यांनी अंत्यविधी करण्याची तयारी दर्शविली. यापूर्वी दाखल झालेल्या खूनी हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली असून आता खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.