Chinchwad Crime News: भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केल्यामुळे ‘त्या’ तरुणाचा खून; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पूर्ववैमनस्यातून एकाला मारण्यासाठी आठजण आले. ते त्याला मारू लागले, मात्र एक तरुण भांडणे सोडविण्यासाठी आला. सहा जणांनी मिळून भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या तरुणालाच ठार मारले. ही घटना शनिवारी (दि. 22) मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास चिंचवडच्या विद्यानगरमधील हनुमान मंदिरासमोर घडली. यातील दोघांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे.

विनोद ऊर्फ पप्प्या राकेश पवार (वय 21, रा. दत्तनगर, शेलार गल्ली, चिंचवड), अजय ऊर्फ एबी गणेश भिसे (वय 20, रा. दत्तनगर, बुद्ध विहाराचे समोर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

नीला सुतार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी यांचा मुलगा शंकर सुतार व आरोपी यांच्यात काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग आरोपी यांच्या मनात होता. शंकर सुतार हा रात्री हनुमान मंदिरासमोर झोपला. त्यावेळी रात्री सव्वाबाराच्या सुमारास आरोपी तेथे आले. झोपेत असलेल्या शंकर याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच  दगडी पाटा डोक्यात मारला. यात शंकर गंभीर जखमी झाला.त्याला पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचा मृत्यू झाला.

सुरुवातीला याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र शंकर याचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये खुनाच्या गुन्ह्याची कलमवाढ करण्यात आली आहे.या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांना माहिती मिळाली की, आरोपी विनोद हा एकासोबत बौद्धनगर, पिंपरी येथे कुणालातरी भेटण्यासाठी आला आहे. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून विनोद आणि अजय या दोघांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींना पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या आणखी सहा साथीदारांसोबत मिळून शंकर सुतार याचा खून केल्याचे सांगितले. मयत शंकर याच्या मित्रासोबत आरोपींची भांडणे होती.

शंकर याच्या मित्राने आरोपींना खुन्नस दिल्याचाही राग आरोपींच्या मनात होता.दरम्यान आरोपी शंकर याच्या मित्राला मारण्यासाठी आले होते. त्याला मारत असताना शंकरने मध्यस्थी केली. त्यामुळे आरोपींनी शंकर यालाच मारले. मारल्यानंतर आरोपी परराज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी शहराच्या बाहेर पडण्याअगोदरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरिक्षक मिलींद वाघमारे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वैभव सोनवणे, अमोल कामठे, पोलीस कर्मचारी विवेक सपकाळे, अनिल गायकवाड, अजिनाथ सरक, श्रीकांत जाधव, जावेद बागसिराज, राजू जाधव (तांत्रिक विभाग), उमेश वानखडे, सोमेश्वर महाडिक, सुहास डंगारे, शहाजी धायगुडे, संजय कु-हाडे, गणेश करपे, ओंकार बंड यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.