Chinchwad Crime News : गायकवाड पिता-पुत्राच्या गुन्ह्यांचा तपास करणार ‘एसआयटी’

एमपीसी न्यूज – औंध येथील उद्योगपती नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड या पिता-पुत्रावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) गुरुवारी (दि. 2) स्थापन केली. तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात सुसूत्रता यावी यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे यांच्या निगराणीखाली ही एसआयटी काम करणार आहे. एसआयटीमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनील टोणपे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संतोष पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पानमंद, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख हे अधिकारी आहेत.

गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड, नानासाहेब शंकर गायकवाड (दोघे रा. आयटीआय रोड, औंध) या दोघांनी आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातूनच त्यांनी साथीदारांसोबत मिळून दंगा, खुनाचा प्रयत्न, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करून मारहाण, कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक, खंडणी उकळण्यासाठी मारहाण, अनैसर्गिक संभोग करून खुनाचा प्रयत्न, दरोडा असे सांगवी, हिंजवडी आणि चिखली पोलीस ठाण्यात सहा गुन्हे दाखल आहेत. याचबरोबर पुणे शहर आणि पुणे ग्रामीणच्या हद्दीत देखील काही गुन्हे दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या तपासात सुसूत्रता यावी. तपास अधिकारी कोणाच्या दबावाखाली येऊ नयेत. वडीलांना आरोपींचा बचाव करण्यासाठी मुद्दे मिळू नयेत, यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.