Chinchwad crime News : ‘त्या’ आरोपींकडून 16 गुन्ह्यांची उकल; मोबाईल फोन, दागिने, दुचाकीसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – दिघी येथे एका पेट्रोल पंपावर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीचा डाव पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने उधळून लावला. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 22 मोबाईल फोन, सोन्याचे दागिने, दोन दुचाकी असा 4 लाख 40 हजार 550 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यामुळे 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.

राहुल रमेश चव्हाण (वय 19, रा. कॉलनी नंबर 2, भारतमाता नगर, दिघी पुणे), शेखर संभाजी जाधव (वय 21, रा. मु. पो. मोघा, ता. उदगिर, जि. लातुर), करण गुरुनाथ राठोड (वय 19, रा. लक्ष्मी ज्वेलर्स मागे, दिघी रोड, भोसरी पुणे), कृष्णा संजय तांगतोडे (वय 20, रा. पुणे फिरस्ता, मुळ रा. रोकडे चाळ, मारूती मंदिराजवळ मु.पो. पाथर्डी, ता. जि. नाशिक), विकी कमल मांझी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता अटक आरोपी, त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार आणि तीन अनोळखी साथीदार यांच्यासोबत मिळून भोसरी, चिखली आळंदी परिसरात घरफोडी, वाहनचोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 81 हजारांचे 22 मोबाईल फोन, 70 हजारांचे सोन्याचे गंठण आणि कानातील जोड, 90 हजार 550 हजारांच्या दोन दुचाकी असा एकूण 4 लाख 40 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या कारवाईमुळे भोसरी पोलीस ठाण्यातील 9 जबरी चोरी, दोन घरफोडी, तीन वाहनचोरी असे 14 गुन्हे तर चिखली आणि आळंदी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी शेखर जाधव याच्यावर उदगीर शहर आणि उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे तीन तर भोसरी पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत.

आरोपी कृष्णा तांगतोडे याच्यावर नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहर, सिन्नर आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

आरोपी करण राठोड याच्यावर भोसरी पोलीस ठाण्यात मारहाणीचा एक गुन्हा दाखल आहे.

आरोपी विकी मांझी याच्यावर एमआयडीसी भोसरी आणि भोसरी पोलीस ठाण्यात दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.