Chinchwad Crime News : आळंदी, चाकण, तळेगावमध्ये वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

एमपीसी न्यूज – आळंदी, चाकण आणि तळेगाव एमआयडीसी परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आळंदी येथे झालेल्या अपघातात ट्रकखाली सापडून पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. याबाबत ट्रक चालकाच्या (एमएच 12 / सीटी 8842) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश श्रीरंग सोळंके (वय 45, रा. वडगाव रोड, आळंदी) असे मृत्यू झालेल्या पादचारी व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत नामदेव कोंडीभाऊ शेजूळ (वय 38, रा. आळंदी देवाची) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सोळंके हे बुधवारी दुपारी पाच वाजता दिघी-आळंदी रोडवरील फुटपाथवरून चालत जात होते. त्यावेळी एक ट्रक फूटपाथवर आला. त्याखाली सापडून सोळंके यांचा मृत्यू झाला. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

चाकण येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अनिल गोविंद पांढरे (वय 35, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस हवालदार संतोष सुपेकर यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अनिल हे 1 नोव्हेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजता चाकण येथे पुणे-नाशिक महामार्गावर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

त्यात अनिल यांच्या डोक्याला, चेह-याला, कमरेला, हाताला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर घटनेची माहिती न देता अज्ञात वाहन चालक निघून गेला.

चाकण पोलीस तपास करीत आहेत.

तळेगाव एमआयडीसी परिसरात भंडारा डोंगराजवळ मंगळवारी (दि. 3) एक अपघात झाला. एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. राजू बाजीराव जाधव (वय 46, रा. तेलगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे.

इग्नाथी बाजीराव जाधव (वय 48, रा. वडगाव शेरी) यांनी बुधवारी (दि. 4) अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.