Chinchwad Crime News : मौजमजेसाठी चोऱ्या करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना अटक

एमपीसी न्यूज – चिंचवड पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी पाच दुचाकी आणि सहा चोरीचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. हे चोरटे मौजमजेसाठी दुचाकी वाहने आणि मोबाईल फोन चोरी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

वीरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय 22, रा. चिंचवडे कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड), आशिष ओमप्रकाश परदेशी (वय 20, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिंचवड परिसरात गस्त घालत असताना पोलीस शिपाई नितीन राठोड यांना माहिती मिळाली की, चिंतामणी चौकाजवळील मोकळ्या मैदानात दोन तरुण संशयितरित्या फिरत आहेत. त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची मोपेड दुचाकी आहे. या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून वीरेंद्र आणि आशिष या दोघांना ताब्यात घेतले.

_MPC_DIR_MPU_II

त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत पोलिसांनी चौकशी केली असता दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आरोपी वीरेंद्र हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्यामुळे पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले आणि कसून चौकशी केली.

त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे असलेली मोपेड दुचाकी चोरीची असल्याचे सांगितले. त्याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दोघांकडे कसून चौकशी केली असता दोघांनी मिळून वाल्हेकरवाडी, निगडी, चिंचवड येथून दुचाकी चोरी केल्या आहेत. तसेच उघड्या घरांमधून चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरातून मोबाईल फोन चोरल्याची कबुली दिली.

दोघांकडून पोलिसांनी तीन लाख 40 हजार रुपये किमतीच्या पाच दुचाकी आणि सहा मोबाईल फोन जप्त केले. या कारवाईमुळे चिंचवड पोलीस ठाण्यातील दोन आणि निगडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण तीन वाहन चोरीचे गुन्हे उकडीस आले आहेत. हिरो होंडा स्प्लेंडर (एम एच 14 / डी एल 5337), (एम एच 14 / सी क्यू 4254) दुचाकींच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित खुळे, सहाय्यक निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, सहाय्यक उपनिरीक्षक मारुती कडू, पोलीस नाईक स्वप्नील शेलार, ऋषिकेश पाटील, विजयकुमार आखाडे, पोलीस शिपाई नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, पंकज भदाणे, सदानंद रुद्राक्षे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.