Chinchwad Crime News : तरुणीच्या अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल; ऑफिसमध्ये जाऊन पिस्तूलच्या धाकाने तरुणीचे अपहरण

एमपीसी न्यूज – बोलण्यास टाळत असल्याने एकाने तरुणीच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला पिस्तूलचा धाक दाखवून तिचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली. याबाबत अपहरणकर्त्या तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 53 वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शंतनू चिंचवडे (रा. पडवळ आळी, चिंचवडगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहृत तरुणी चिंचवड येथील एका ठिकाणी काम करते. तिचे आणि आरोपीचे मागील चार वर्ष पासून मैत्रीचे संबंध आहेत. तरुणी आरोपीला मागील काही दिवसांपासून टाळत होती. तसेच त्याच्याशी जास्त बोलत नव्हती. त्यावरून आरोपीने तरुणी काम करत असलेल्या ऑफिसमध्ये जाऊन तिला पिस्तूलचा धाक दाखवून तिला जबरदस्तीने पळवून नेले. ही घटना आज मंगळवारी (दि. 19) सकाळी अकरा ते सव्वा अकराच्या दरम्यान घडली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस निरीक्षक आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर पोलीस पथके आरोपीच्या मागावर रवाना करण्यात आली. काही तासात पोलिसांनी अपहरण करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.