Chinchwad Crime News : गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात शहरात आणखी कठोर कारवाई होणार

पोलीस आयुक्तांच्या पोलिसांना सूचना ; स्टार सिक्युरिटीचा परवाना रद्द होणार

एमपीसी न्यूज – तुरूंगातून सुटल्यानंतर गुंड गजानन मारणे याची तळोजा (नवी मुंबई) ते पुणे या मार्गावरून रॅली काढण्यात आली. याबाबत पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरू आहे. या प्रकरणातील पहिला गुन्हा पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील शिरगाव चौकीत दाखल झाला. रॅलीमध्ये खाजगी सुरक्षा रक्षक वापरले, सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी करून रस्त्यावर दहशत निर्माण केली. टोल नाक्यावर पैसे न देता वाहने सोडली. याबाबत आणखी कठोर केली जाणार आहे. याबाबतच्या सूचना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पोलिसांना दिल्या आहेत.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, गुंड गजानन मारणे रॅली प्रकरणात द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना त्याच्या ताफ्यातील काही जणांनी टोल नाक्यावर दहशतीचे वातावरण निर्माण करून टोल न भरता त्यांच्या ताफ्यातील वाहने सोडली.

गजानन मारणेच्या समर्थकांनी टोल नाक्यावरील बॅरिकेड काढून टोल न भरता वाहने दामटवली. टोल नाक्यावर वाहन चालकांकडून घेतल्या जाणाऱ्या टोलमध्ये शासनाचा देखील वाटा असतो. त्यामुळे त्याबाबत आणखी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आतापर्यंत रॅली प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी 13 महागड्या कार जप्त केल्या आहेत. तसेच 32 आरोपींना अटक केली आहे. विविध पथकांची निर्मिती करून आरोपींच्या मागावर ही पथके रवाना करण्यात आली असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

रॅलीमध्ये स्टार सिक्युरिटी या सुरक्षा रक्षक पुरवणा-या संस्थेचे सुरक्षा रक्षक वापरले आहेत. त्यामुळे त्या कंपनीवर देखील कारवाई केली जाणार आहे. स्टार सिक्युरिटीचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात टोळ्या करून दहशत पसरवू नका; अन्यथा कठोर कारवाई होणार, असा गुन्हेगारांना दम देखील पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.