MPC News Impact : ठरलं ! गुरुवारी होणार शहरातील रिक्षांचा ‘मीटर डाऊन’

पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात रिक्षा चालक सध्या मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करतात. त्यांच्या या मनमानीला आता चाप लागणार आहे. शहरातील रिक्षांना आता मीटर प्रमाणे भाडेआकारणी करावी लागणार असून त्याची सुरुवात येत्या गुरुवारपासून (दि. 21) करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

पूर्वी पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या विरळ असल्याने उपनगरात भाडे घेऊन गेलेल्या चालकाला पुन्हा रिकामी रिक्षा घेऊन परत यावे लागत असे. त्यामुळे रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे न घेता रिटर्नचे देखील भाडे मनमानी पद्धतीने घेत होते.

आता शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे. तरीदेखील रिक्षा चालक अद्यापही मनमानी पद्धतीने भाडे आकारणी करीत आहेत. याबाबत पोलीस आयुक्‍त आणि वाहतूक पोलिसांकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

मागील आठवड्यात पोलीस आयुक्‍त कृष्ण प्रकाश यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक पोलीस आणि रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत मीटरप्रमाणे रिक्षाभाडे घेण्याबाबत सर्वसहमतीने निर्णय घेण्यात आला.

रिक्षा संघटनांनी देखील याबाबत तयारी दर्शविली आहे. त्यानुसार येत्या गुरूवारपासून मीटर प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येणार आहे.

शहरातील अनेक मार्गावर शेअर रिक्षा धावतात. या रिक्षांनाही मीटरप्रमाणे भाडे आकारणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रिक्षामध्ये जेवढे प्रवासी असतील त्यांनी मीटरप्रमाणे आलेले भाडे विभागून भरणे अपेक्षित आहे. मीटर प्रमाणे भाडे आकारणी न करणाऱ्या रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.