-MPC-TOP-MOST-BANNER-I

Watch Traffic Police Stuck in the Car bonnet : पाहा…. कारच्या बोनेटमध्ये पाय अडकलेल्या वाहतूक पोलिसाला घेऊन एक किलोमीटर प्रवास!

कार अंगावर घालून वाहतूक पोलिसाला जिवे मारण्याचा प्रयत्न

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कारवाईसाठी वाहतूक पोलीस थांबवत असताना पोलिसाचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला. याही स्थितीत माथेफिरू चालकाने गाडी पुढे पळविली. जीव वाचविण्यासाठी पोलीस कर्मचारी बोनेटवर बसला. त्याच अवस्थेत सुसाट गाडी पळवत कार चालकाने पोलिसाला एक किलोमीटर नेले.

पुढील चालकाने गाडी थांबविल्याने त्या पोलिसाचा प्राण वाचला. मात्र फरफटत नेल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्‍चर झाला आहे. ही घटना चिंचवडगाव येथे आज ( गुरुवार, दि. 5) सायंकाळी घडली.

आबा विजय सावंत असे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर युवराज किसन हातवडे (वय 49, रा. पिंपळे निलख) असे माथेफिरू वाहन चालकाचे नाव आहे. खुनाच्या प्रयत्नाचा तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा वाहन चालकावर दाखल करण्यात आला आहे.

पोलीस कर्मचारी आबा सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी चिंचवडगाव परिसरातील अहिंसा चौक (एल्प्रो चौक) परिसरात चिंचवड वाहतूक शाखेतील पोलीस नाईक आबा सावंत हे मास्क न लावलेल्या वाहन चालकांवर कारवाई करीत होते. त्यावेळी आरोपी युवराज हातवडे हा त्याच्या कारमधून (एमएच 01 / वाय 8837) तिथे आला. त्याने तोंडाच्या खाली मास्क घेतल्याने पोलिसांनी त्यास कार बाजूला घेण्यास सांगितले.

कार बाजूला घेतो असे म्हणून तो पळून जाण्याचा प्रयत्न करून लागला. त्यावेळी कारच्या समोर पोलीस कर्मचारी सावंत हे होते. तो कार पुढे घेत असताना सावंत यांचा पाय कारच्या बोनेटमध्ये अडकला. त्याने आरोपी युवराज याला सांगूनही त्याने कार पुढे घेतली.

जीव वाचविण्यासाठी सावंत हे कारच्या बोनेटवर बसले. कारच्या वरील बाजूस असलेल्या ऍन्टीनाला धरले. मात्र माथेफिरू कार चालकाने त्याही स्थितीत कार पुढे दामटली. जवळपास एक किलोमीटर हा थरार सुरू होता. रस्त्यावरील दुचाकी वाहन चालकांनी तसेच वाहतूक पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. तरीही कार चालकाने कार थांबविली नाही.

त्यानंतर एक दुचाकी चालकाने कारच्या पुढे जाऊन पुढच्या कार चालकाला गाडी थांबविण्याची विनंती केली. त्यानुसार पुढील वाहन चालकाने कार थांबविल्यानंतर माथेफिरू वाहन चालकाने कार थांबविली. दरम्यान चिंचवड पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलिसांनी माथेफिरू कार चालकाला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn