Chinchwad Crime : पिंपरी चिंचवड पोलिसांचा सात ठिकाणी छापा; दहा लाख 86 हजारांचा दारूसाठा जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगवी, भोसरी, दिघी, देहूरोड परिसरात सात ठिकाणी छापे मारून दहा लाख 86 हजारांचा दारूसाठा जप्त केला. यामध्ये अमली पदार्थ विरोधी पथक, सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा युनिट पाच आणि स्थानिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने सांगवी परिसरातील गणेश नगर येथे छापा मारून एका दुचाकीस्वाराकडून 27 हजार 670 रुपयांचा दारूसाठा जप्त केला. अतुल वसंत टेकाळे (वय 35, रा. नवी सांगवी) याच्याविरोधात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलिसांनी बालाजीनगर परिसरातून 1 हजर 700 रुपये किमतीची हातभट्टीची तयार दारू जप्त केली. याप्रकरणात पप्पू धर्मा वाघमारे (वय 35, रा. बालाजीनगर, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलिसांनी दोन ठिकाणी छापेमारी करत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पहिल्या प्रकरणात 3 हजार 326 रुपयांच्या देशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तर दुसऱ्या प्रकरणात चार हजार 434 रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई केली आहे. पहिल्या कारवाईमध्ये दोघांना अटक करून त्यांच्याकडून 10 हजार 180 रुपये किमतीच्या 62 बिअरच्या आणि दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. दुसऱ्या कारवाईत दोन हजार चाळीस रुपये किमतीच्या 12 बिअरच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. दुसऱ्या कारवाईमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोन्ही कारवाई देहूरोड परिसरात करण्यात आल्या आहेत.

देहूरोड परिसरात सामाजिक सुरक्षा विभागाने एक कारवाई केली आहे. त्यात पोलिसांनी देशी विदेशी दारूच्या बाटल्या आणि एक कार असा एकूण 10 लाख 36 हजार 188 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.