Chinchwad Crime : शहरातून आणखी सहा दुचाकी एक पिकअप टेम्पो चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकंदरीत वाहन चोर पोलिसांनाच आव्हान देत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना मात्र नाहक त्रास होत आहे.

वाहन चोरांच्या दररोजच्या प्रतापामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातून आणखी सहा दुचाकी आणि एक पिक अप टेम्पो चोरीला गेल्याबाबत बुधवारी (दि. 23) संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

घरासमोर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली वाहने तसेच सार्वजनिक ठिकाणी लावलेली वाहने चोरट्यांचे लक्ष्य ठरत आहेत. चाकण पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश गणपत बुरसे (वय 29, रा. कडाचीवाडी, चाकण) आणि प्रमेश महादेव सावके (वय 30, रा. नाणेकरवाडी, चाकण) यांच्या दोन दुचाकी घराच्या पार्किंगमधून चोरून नेल्या आहेत. तर तुषार रामभाऊ घोळवे (वय 25, रा. चाकण) यांनी निघोजे येथील एअर इंडिया कंपनीच्या गेटसमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी भरदिवसा चोरून नेली आहे.

संजय श्रीकांत संभेराव (वय 25, रा. कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. हनुमंता भीमा नायडू (वय 40, रा. समर्थनगर, माळवाडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नायडू यांची 30 हजारांची दुचाकी शुभम शिवाजी खांडेकर (वय 25, रा. शीतळानगर, देहूरोड) या चोरट्याने चोरून नेली. पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे.

अनिल बाबुराव वाडेकर (वय 23, रा. हिंजवडी) यांची दुचाकी देखील घरासमोरून चोरीला गेली आहे. याबाबत त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात एक पिक अप चोरीला गेल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत विशाल राम फुगे (वय 40, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. रस्त्याच्या बाजूला पार्क केलेला दोन लाखांचा टेम्पो अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 23) सकाळी उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.