Chinchwad : प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 185 जणांवर गुन्हे दाखल

एमपीसी न्यूज – प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 185 जणांवर सोमवारी (दि. 27) पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, पिंपरी चिंचवड शहराला संक्रमित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे शहराला पूर्णपणे सील करण्यात आले आहे. रविवारी (दि. 27) पिंपरी चिंचवड शहरात प्रशासनाच्या आदेशाचे पालन न केल्याबाबत 113 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर शनिवारी हा आकडा 204 एवढा होता.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित केले आहे. या लॉकडाऊनची मुदत पुन्हा 3 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊन सोबतच संचारबंदीचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत. मात्र शासनाच्या या आदेशाकडे दुर्लक्ष करीत दुकाने सुरू ठेवणाऱ्या, संचारबंदी आदेशाचा भंग करून मोकाट फिरणाऱ्या तसेच मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे.

हिंजवडी परिसरात दररोज सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होत आहे. आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडीतील नागरिक प्रशासनाच्या आदेशाला सर्वाधिक पायदळी तुडवत असल्याचे दिसत आहे. सोमवारी हिंजवडी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी 26 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सोमवारी पिंपरी चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे एमआयडीसी भोसरी (2), भोसरी (5), पिंपरी (18), चिंचवड (15), निगडी (12), दिघी (14), म्हाळुंगे चौकी (11), सांगवी (16), वाकड (26), हिंजवडी (26), देहूरोड (7), तळेगाव दाभाडे (4), चिखली (16), रावेत चौकी (6), शिरगाव चौकी (1) एकूण 185 जणांवर कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.