Pune/Chinchwad: बँक बंद झाल्याचे ‘एसएमएस’ आल्याने घाबरलेल्या ग्राहकांची ‘पीएमसी’ बँकेत गर्दी

एमपीसी न्यूज – पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बंद झाल्याचे ‘एसएमएस’ आल्याने घाबरलेल्या ग्राहकांची आज (मंगळवारी) या बँकेच्या चिंचवड, डांगे चौक येथील शाखेसमोर गर्दी झाली होती. तसेच पैसे परत देण्याची मागणी त्यांनी बँक व्यवस्थपानाकडे केली. यामुळे काही काळ गोंधळाचे वातावारण निर्माण झाली होते.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत. 23 सप्टेंबर पासून हे निर्बंध लागू झाले आहेत. बँकेची सद्यस्थिती पाहून नागरिकांच्या हितासाठी बँकेवर निर्बंध आणल्याचं रिझर्व्ह बँकेने आपल्या आदेशात नमूद केल आहे. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील.

आरबीआयने निर्बंध लादल्याच समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. चिंचवड, डांगे चौक येथील पीएमसी बँकेच्या शाखेसमोर सकाळी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. मोठी गर्दी जमली आहे. खातेदारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

या बँकेत आमचे खाते होते. सोमवारी रात्री नऊ वाजता बँक बंद झाल्याचा अचानक एसएमएस आला. वडील रुग्णालयात अॅडमिट आहेत. त्यासाठी पैसे लागत होते. पैसे भेटणार नसल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. आता पैसे कोठून द्यायचे. मोठी समस्या निर्माण झाली आहे. बँकेने यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे होता, अशी प्रतिक्रिया खातेदार देविदास बुचडे यांनी दिली. आमचे कष्टाचे पैसे असून पैसे आम्हाला तत्काळ देण्यात यावेत, अशी मागणी खातेधारकांनी केली.

पुण्यातील पाषाण-सूस येथील पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेत मोठ्या प्रमाणात खातेदारांनी गर्दी केली आहे. आपल्या खात्यातून केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लाखो रुपये बँकेत असल्याने खातेदार संकटात सापडले आहेत. तसेच पीएमसी बँक बंद झाल्याच्या अफवेने देखील खातेदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला. यामुळे खातेदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून पैसे काढण्यासाठी बँकेत खातेदारांनी एकाच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. तरीही, पीएमसी बँकेने ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.