Chinchwad : पायल नृत्यालयाच्या वतीने ‘नृत्यानुग्रह’ कार्यशाळा

एमपीसी न्यूज – गुरुपौर्णिचे औचित्य साधून चिंचवडच्या पायल नृत्यालयाच्या वतीने ‘नृत्यानुग्रह’ या कथकच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. संस्थेच्या संचालिका पायल गोखले यांनी ही कार्यशाळा चिंचवडच्या घारेशास्त्री सभागृहात आयोजित केली होती. नृत्यांगना गुरु पंडिता मनीषा साठे यांनी विद्यार्थिनींना कथकबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत 50 विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

कार्यशाळेत मनीषाताईंनी विविध रचनांमधून हस्तकांचे सौंदर्य आणि ततकारमधील स्पष्टता विद्यार्थिनींना समजावली. तोडे, परन, जरब, चलन यांसारखे कथकमधील आवश्यक असे प्रकार शिकवले.

मनीषा साठे म्हणाल्या की, हस्तकाचे संचलन करताना नर्तकाच्या शरीराची सूक्ष्म हालचाल होते. त्यावर हस्तकाचे सौंदर्य अवलंबून असते. पढंत करताना नर्तकाने आपल्या देहबोलीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. लयींशी खेळणे हा ततकाराचा गुणधर्म आहे. ततकारातील जरब, आघात आणि देहबोलीतून ततकाराची स्पष्टता दाखवता आली पाहिजे. यासाठी सराव आवश्यक आहे तेव्हाच तुमचा नृत्याचा प्रवास सुकर होईल असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

संचालिका पायल गोखले म्हणाल्या की, ज्येष्ठ नर्तकांना आपण नृत्य करताना कार्यक्रमांत पाहतो. या नर्तकांकडून नृत्य शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आली. यातून या दिग्गज गुरुंचा नृत्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन, नृत्यरचनेतील बारकावे, सादरीकरणामागचा विचार या गोष्टी शिकता येतात. कलाकाराकडून कला शिकण्याबरोबरच ती कला कशी जगायची याचे संस्कार सहवासातून घडतात हाच या कार्यशाळेचा उद्देश होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.