Chinchwad : दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरण; ‘राष्ट्रवादी’चा पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे जनसंपर्क कार्यालय तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावे, या मागणीसाठी शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज (मंगळवारी) पोलीस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला.

या मोर्चात शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी आमदार विलास लांडे, नगरसेवक नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, संजय वाबळे, प्रशांत शितोळे, नगरसेविका संगीता ताम्हाणे, शमीम पठाण, फजल शेख, विशाल काळभोर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • कार्यालय तोडफोड प्रकरणातील मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असल्याने पोलीस प्रशासनाची कारवाई कुठपर्यंत आली आहे, असा जाब कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारला. विरोधी पक्षनेते दत्ता साने आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी.

तसेच शहरात कायदा व सुव्यवस्था राखावी, अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मोर्चादरम्यान करण्यात आल्या. त्याचबरोबर काळेवाडी आणि निगडी येथे अल्पवयीन मुलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.

  • दरम्यान, दत्ता साने कार्यालय तोडफोड प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आरोपी मोकाट असताना पोलिसांकडून कोणतीही हालचाल करण्यात येत नाही. पोलिसांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कारवाईचे केवळ आश्वासन दिले जात आहे. मात्र, कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीत. असे या मोर्चादरम्यान सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.