Chinchwad : संचारबंदीमुळे शहराला छावणीचे स्वरूप असतानाही भरदिवसा घरफोडी; वाहनचोरीच्या घटना

एमपीसी न्यूज – संचारबंदीच्या काळातही चोरटे आपला प्रताप दाखवत आहेत. दररोज कुठल्यातरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या घटना घडत आहेत. चौकाचौकात पोलीस तैनात असून शहराला लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. अशा परिस्थितीत देखील दिघी येथे एका चोरट्याने भर दिवसा अवघ्या अर्ध्या तासात घरफोडी केली आहे. तर प्रशासनाच्या परवानगीशिवाय वाहन चालविण्याला परवानगी नसताना एका बहाद्दर चोरट्याने भर दिवसा काळेवाडी मधील डी मार्टच्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेली आहे.

दिघी येथील घटना सोमवारी (दि. 30) सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे. पिंटू बाबू डाकवा (वय 33, रा. गायकवाड नगर, दिघी) यांनी मंगळवारी (दि. 31) याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी निजाम हैदर शेख (वय 19, रा. गायकवाड नगर, दिघी) या चोरट्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डाकवा यांचे घर सोमवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या दरम्यान बंद होते. त्यावेळी चोरटा निजाम याने त्यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून आतील 11 हजार रुपयांचा मोबाईल व दोन सीमकार्ड चोरून नेले. दिघी पोलीस तपास करीत आहेत. संचारबंदी लागू झाल्यानंतर सुरवातीच्या दोन दिवसात एकही गुन्हा दाखल झाला नाही. आता मात्र चोरट्यांनी संचारबंदीच्या काळात पुन्हा आपले डोके वर काढले आहे.

डी मार्टच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीची घटना मंगळवारी (दि. 31) दुपारी एक ते दोन वाजताच्या दरम्यान घडली. राकेश दिनदयाळ अग्रवाल (वय 42, रा. साई कॉलनी, काटे वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अग्रवाल यांची 35 हजार रुपये किंमतीची एमएच 14 / ईजे 5786 ही दुचाकी काळेवाडी येथील डी मार्टच्या पार्किंगमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजता पार्क केली. एक तासाने ते जीवनावश्‍यक वस्तू खरेदी करून पुन्हा पार्किंगमध्ये आले असता त्यांना आपली दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.