Chinchwad : अन्ननलिकेत प्लॅस्टिक अडकल्याने उपचाराविना कालवाडीचा रस्त्यात तडफडून मृत्यू

एमपीसी न्यूज – प्लॅस्टिक अन्ननलिकेत अडकल्याने साडेतीन वर्षाच्या कालवाडीचा भर रस्त्यात तडफडून मृत्यू झाला. गोरक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि तरुणांनी गायीला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, डॉक्टर वेळेत उपलब्ध न झाल्याने गायीचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 26) मोहननगर चिंचवड येथे घडली.

सोमवारी दुपारी चारच्या सुमारास चिंचवड स्टेशन चौकातून मोहननगरकडे जाणा-या रस्त्यावर लुमॅक्स कंपनीजवळ एक गाय (कालवड) पाय खोडत पडली. सुरुवातीला बघ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. पण, हा प्रकार बराच वेळ सुरु राहिल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी एकच गर्दी केली. बघ्यांची गर्दी झाली. रस्त्यावर विव्हळत पडलेल्या कालवाडीचे दुःख नागरिकांना देखील समजू लागले. पण, बघ्यांचा इलाज चालला नाही.

अमोल शिंदे, राजाराम सांडभोर, निशांत शेवाळे, सतीश निमसे या कार्यकर्त्यांनी कालवाडीला हवा मोकळी करून दिली. तसेचा बघ्यांच्या गर्दीमुळे झालेली वाहनांची गर्दी पांगवली. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याने पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी एका पशु वैद्याला बोलावले. डॉक्टरांनी तात्पुरते सलाईन लावून त्यातून इंजेक्शन दिले. मात्र, प्लास्टिक गायीच्या अन्ननलिकेत अडकल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते. त्यासाठी गायीला तात्काळ पांजरपोळ येथील गोशाळेत हलवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

सतीश निमसे यांनी त्यांच्या टेंपोतील ट्रान्सपोर्टचा माल रस्त्यावर खाली केला आणि त्यांच्या टेंपोमधून कालवाडीला पांजरपोळ येथील गोशाळेत हलवण्यात आले. मोहननगर येथून निघण्यापूर्वीच पांजरपोळ येथील डॉक्टरांना घटनेची माहिती देऊन तात्काळ बोलावण्यात आले. सर्व कार्यकर्ते पांजरपोळ येथील गोशाळेत पोहोचले. परंतु डॉक्टर वेळेत आले नाहीत. डॉक्टर येईपर्यंत बराच उशीर झाला होता. श्वास न मिळाल्याने गायीने टेंपोतच तडफडून जीव सोडला.

मोहननगर येथील विशाल यादव यांना कार्यकर्त्यांनी याबाबत फोन केला. यादव यांनी महापालिकेच्या पशुवैद्यकीय अधिका-यांना मदतीसाठी फोन केला असता पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरात शेकडो फिरस्ती जनावरे आहेत. त्यांची व्यवस्था प्रशासनाने करायला हवी. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी ठोस उपाय करायला हवेत. डॉक्टर वेळेत उपलब्ध झाले नसल्याने आजचा प्रकार घडला आहे. त्यामुळे डॉक्टरांनी वेळेत उपलब्ध होण्यासाठी देखील प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.