Chinchwad : शस्त्र परवाना रिपोर्ट पॉझिटिव्ह देण्यासाठी उपायुक्तांच्या नावाने दोन लाखांची मागणी; पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन

एमपीसी न्यूज – शस्त्र परवाना प्रकरणाचा रिपोर्ट उपायुक्तांकडून पॉझिटिव्ह करून देण्यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्याने अर्जदाराकडे दोन लाख रुपयांची मागणी केली. हे प्रकरण पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचताच आयुक्तांनी संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

पोलीस नाईक सुभाष विलास बहिरट (नेमणूक – निगडी पोलीस स्टेशन. प्रतिनियुक्ती – पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक यांचे कार्यालय) असे निलंबित केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चिंचवड येथील एका व्यक्तीने शस्त्र परवाना मिळण्यासंदर्भात अर्ज केला होता. हे प्रकरण 11 मार्च रोजी पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक यांच्या कार्यालयात आले. या कार्यालयात पोलीस नाईक बहिरट शस्त्र परवाना, माहिती अधिकार आणि तडीपार संदर्भातील कामकाज पाहतात.

चिंचवड मधील व्यक्तीचे शस्त्र परवाना मिळण्यासाठी उपआयुक्त परिमंडळ एक या कार्यालयात प्रकरण आल्यानंतर पोलीस नाईक बहिरट यांनी अर्जदार व्यक्तीला तीन वेळा फोन करून उपायुक्तांच्या नावाने दोन लाख रुपयांची मागणी केली. उपायुक्तांकडून शस्त्र परवाना प्रकरणी रिपोर्ट पॉझिटिव्ह करून देण्यासाठी ही रक्कम मागितली.

याप्रकरणी नैतिक अध:पतनाचे, भ्रष्टाचारास चालना देणारे, पोलीस प्रशासनाची जनमानसात प्रतिमा मलिन होण्यासारखे, अशोभनीय गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी पोलीस नाईक बहिरट यांचे निलंबन केले.

परिमंडळ एकचे पोलीस उपआयुक्त मंचक इप्पर म्हणाले, “या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अशा प्रकरणांची सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी चौकशी करत असतात. त्या चौकशीतून नेमका प्रकार उघडकीस येईल.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.