Chinchwad: आठ दिवसात पवना नदीमधील जलपर्णी काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

आयुक्तांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांचा इशारा

एमपीसी न्यूज – शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराची वाढ नदीकिनारील परिसरात होत आहे. महापालिका प्रशासन जलपर्णीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. येत्या आठ दिवसात जलपर्णी काढण्यास सुरुवात करावी. अन्यथा आयुक्तांच्या निवासस्थानासमोर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी दिला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात चिंचवडे यांनी म्हटले आहे की, पवना नदीमध्ये भरमसाठ जलपर्णी साचली आहे. हवामान बदलामुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. शहरात नदीपात्रात डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराची वाढ नदी किनाऱ्यावरील रावेत, पुनावळे, वाल्हेकरवाडी, ताथवडे, चिंचवड, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, पिंपळेसौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी परिसरात होत आहे.

जलपर्णी ही दरवर्षी कोणत्या महिन्यात जास्त वाढते. त्याची कारणे शोधून जलपर्णीमुक्त नदीपात्र करण्यासाठी वार्षिक नियोजन करणे गरजेचे आहे. परंतु, प्रशासनाकडे विचारणा केली असता. प्रशासनाचा प्रस्ताव, आयुक्तांची मान्यता, निविदा प्रक्रिया, स्थायीकडे विषयपत्र पाठविले आहे, मंजुरी बाकी अशी उत्तरे दिली जात आहेत. मूलभूत नागरी सुविधांकडे महापालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याने शहरात सुरु असलेल्या स्वछ-भारत अभियान व राहण्यायोग्य शहर सर्वेक्षणांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे, असेही जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.