Chinchwad crime News : पाच लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – व्यावसायिक ओळखीतून घेतलेले पैसे परत देण्यासाठी टाळाटाळ केली. याबाबत संबंधित व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

जगदीश बळवंत कळसकर (रा. तळेगाव दाभाडे) यांनी याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी चंद्रशेखर धोंगडे या व्यक्तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

कळसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धोंगडे यांनी कळसकर यांच्याकडून व्यावसायिक ओळखीतून पाच वर्षांपूर्वी पाच लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी आज देतो, उद्या देतो असे म्हणत टाळाटाळ केली. धोंगडे यांनी आणखी काही लोकांकडून अशा प्रकारे पैसे घेतले आहेत.

कोरोना काळामुळे कळसकर कुटुंब आर्थिक अडचणीत आहे. आर्थिक अवस्था दयनीय असून त्यांना न्याय मिळावा. तसेच धोंगडे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

कळसकर यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार नाही – धोंगडे

दरम्यान, कळसकर यांच्याशी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला नसल्याचा दावा धोंगडे यांनी केला आहे. त्याबाबतचे सर्व पुरावे आपण पोलिसांना दिले आहेत. विनाकारण व्यावसायिक बदनामी करण्यासाठी आपल्याविरुद्ध खोटी तक्रार करण्यात  आल्याचा प्रत्यारोप धोंगडे यांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.