Chinchwad : चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या विकासकामांचे ‘ई-भूमिपूजन’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (बुधवारी)’ई-भूमिपुजन’ करण्यात येणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचा समावेश आहे. याशिवाय पोलीस आयुक्तलायाच्या इमारतीचे देखील उद्‌घाटन त्यांचे हस्ते केले जाणार आहे. याबाबतची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहराच्या दौ-यावर आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरु करण्यात येणा-या विविध विकासकामांचे त्यांच्या हस्ते ‘ई-भूमिपुजन’ करण्यात येणार आहे. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता हा भुमिपूजन समारंभ होणार आहे.  यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, श्रीरंग बारणे, सुप्रिया सुळे, शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, गौतम चौबुकस्वार, महेश लांडगे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत.

विकास कामाच्या ठिकाणी न जाता  मुख्यमंत्री चिंचवड येथून एकाच जागेवरुन ‘ई-भूमिपूजन’ करणार आहेत. त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेच्या च-होलीतील  (1442 सदनिका), रावेत (934),  मोशी – बो-हाडेवाडी( 1288), आकुर्डी (500 )आणि पिंपरी (300)या कामाचे भुमिपूजन केले जाणार आहे. त्याचबरोबर स्मार्ट सिटी अंतर्गत सिटी नेटवर्क, सिटी वायफाय, स्मार्ट स्किवॉस्क, व्हेरियेबेयल मेसेज डिस्पले सोल्यूशन याबाबात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याच्या कामाचा शुभारंभ, अर्बन स्ट्रीटनुसार डिझाईनअंतर्गत शहरातील अंतर्गत रस्ते विकसित करण्यात येणार आहेत. या कामाचे देखील भुमिपूजन करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.