Chinchwad : देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी पुन्हा येईन ‘ पण…..

एमपीसी न्यूज – माझा स्वभाव शांत आहे. पण, अनेकांना वाटत नाही. लहानपणी मी खोड्या करत नव्हतो. पण, खोड्यांचा साक्षीदार असायचो. मी ‘सीझनल’ खेळ खेळायचो. बॅटिंग केली की मी फिल्डिंग करत नव्हतो. पळून जात होतो, अशा शालेय जीवनातील आठवणींना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उजाळा दिला. तसेच मी ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’च्या कार्यक्रमाला पुन्हा येईन’ असे सांगताच सभागृह हास्यकल्लोळात बुडाले.

कर्तव्य फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने शहरातील युवक युवतींना सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात आपल्यातील गुण कौशल्य सादर करण्यासाठी आयोजित ‘मोरया युथ फेस्टिव्हल 2020’चे उद्घाटन आज (शनिवारी) त्यांच्या हस्ते झाले. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात फडणवीस यांची सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर आणि सचिन पटवर्धन यांनी मुलाखत घेतली.

चांगले वाईट समजणे हे संस्कार असतात. संघामध्ये आम्हाला देशभक्तीच्या संस्काराचे धडे मिळाले. ज्यांच्यासोबत राहतो त्यांच्याकडून चांगले गुण, संस्कार घेता येतात असे सांगत फडणवीस म्हणाले, “माझ्यावर शिक्षणासाठी घरातून कोणाचे प्रेशर नव्हते. 11 महिने उनाडक्या करायचो आणि परीक्षेच्या आधी एक महिना अभ्यास करत होतो”

“शाळेत असताना नाटकांमध्ये सहभाग घेत होतो. त्यामध्ये सुदैवाने दोनवेळा राजकीय नेत्याच्या भूमिका माझा वाट्याला आली होती. पूर्वी रामदास आठवले यांच्यासारख्या कविता करत होतो. परंतु, आता करत नाही. मला गाणे ऐकण्याचा छंद असून सुमारे दोन हजार गाणी पाठ आहेत” अंताक्षरीत मी कधीच हरु शकत नाही असा दावाही फडणवीस यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.