BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : दिगंबर रौंधळ यांना ‘श्याम’ तर कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांना साने गुरुजी श्रम साधना पुरस्कार

एमपीसी न्यूज – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने देण्यात येणारा ‘श्याम’ पुरस्कार यंदा पुणे महसूल विभागाचे उपनिबंधक दिगंबर रौंधळ यांना तर कामगार नेते दत्तात्रय येळवंडे यांना साने गुरुजी श्रम साधना पुरस्कार देऊनगैरविण्यात आले. दिगंबर रौंधळ यांच्या मातोश्री भामाबाई रौंधळ यांना ‘श्यामची आई’ पुरस्कार देण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात शुक्रवारी (दि. 20) झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी होते. यावेळी उद्योजक रंगनाथ गोडगे पाटील, सुदाम भोरे, मुरलीधर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी साने गुरुजी संस्कार शाळा सन्मान भोसरीतील शेठ रामधारी आगरवाल विद्यालयाला प्रदान करण्यात आला तर रुपीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयाला यशवंतराव चव्हाण बहुजन हिताय सन्मान देऊन गौरविण्यात आले. ‘आईच्या संस्कारातून घडलेले साने गुरुजी’ या विषयावर गुणवंत कामगार बाजीराव सातपुते यांनी आपले विचार मांडले.

” धार्मिक विसंवाद व संघर्षाच्या कालखंडात विरोधी पक्षासहित इतर कुणालाही विश्वासात न घेता मोदी-शहा यांनी बहुमताच्या बळावर हुकूमशाही लादणारा निर्णय घेतला आहे” अशी टीका डॉ. श्रीपाल सबनीस यांनी यावेळी बोलताना केली. नागरिकत्व कायदयाची अमलबजावणी करण्यासाठी एवढी घाई काय असा सवाल करीत सबनीस म्हणाले, ” कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरणाचा छुपा अजेंडा मोदी-शहा यांच्या भूमिकेत दिसून येत असल्याची शंका येते. जो कायदा हिंसेला प्रवृत्त करतो त्या कायद्याचे मी समर्थन करू शकत नाही ” असे डॉ सबनीस म्हणाले.

प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. स्वागत सुदाम भोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले तर आभार मुरलीधर साठे यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषद, आशिया मानवशक्ती विकास संस्था, महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद, लायन्स क्लब भोजपुरी गोल्ड, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद भोसरी यांच्या सहकार्याने करण्यात आले. पुरस्काराचे हे 19 वे वर्ष होते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like