Chinchwad : रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शनिवारी रंगणार दिवाळी पहाट – जल्लोष बालगोपाळांचा!

एमपीसी न्यूज- आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बालकलाकारांना ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडकरांना मिळणार आहे. निमित्त आहे ते ‘दिवाळी पहाट अर्थात जल्लोष बालगोपाळांचा’ या कार्यक्रमाचे! ‘प्रभाती सूर नभी रंगती’ याची प्रचिती या कार्यक्रमातून रसिकांना निश्चितच येईल.  हा कार्यक्रम शनिवारी (दि. 26) पहाटे साडेपाच वाजता चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. 

औद्योगिक नगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमधून अनेक कलाकार उदयास येत आहेत तर उद्योगनगरीला सांस्कृतिक चेहरा देण्याचा प्रयत्न सामाजिक क्षेत्रातील धुरीण करीत आहेत. याच अनुषंगाने समर्थ प्रॉडक्शन आणि मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे शनिवारी (दि. 26) दिवाळी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम पहाटे साडेपाच वाजता चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार असल्याची माहिती समर्थ प्रॉडक्शनच्या रमा पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

अभंग, भक्तिगीत त्याचप्रमाणे लोकप्रिय गीतांचा मिलाफ असलेल्या या कार्यक्रमात चैतन्य देवढे, अंशिका चोणकर, सोहम गोराणे, सई जोशी, अभिषेक कांबळे, अंजली गायकवाड, ऋचा पाटील आणि भारतरत्न भीमसेन जोशी यांचा नातू विराज श्रीनिवास जोशी यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रमाचे संगीत संयोजन शामजी गोराणे यांनी केले आहे.

प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळीनिमित्त आयोजित केलेल्या बालकलाकारांच्या सुरेल मैफलीस रसिकांनी आवर्जून हजेरी लावून दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजक रमा पाटील यांनी केले आहे. हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून अधिक माहितीसाठी 9168317876 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.