Chinchwad: चिंचवड येथील रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने करा – अश्विनी चिंचवडे

Do road repair work at Chinchwad immediately - Ashwini Chinchwade

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील रस्टन कॉलनी, पवनानगर, तानाजीनगर येथील काँक्रीटीकरणाची कामे सुरु होती. कोविडच्या संकटकाळात ही कामे बंद राहिली. पण, कोविडच्या संकटकाळापर्यंत अपेक्षित काम का झाले नाही, याचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे शिवसेना नगरसेविका अश्विनी चिंचवडे-पाटील यांनी म्हटले आहे.

तसेच अर्धवट अवस्थेतील रस्त्यांची कामे अपघातास निमंत्रण देत आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांची तात्पुरती दुरुस्तीची कामे तातडीने करावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत नगरसेविका चिंचवडे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 18 चिंचवड येथील रस्टन कॉलनी, पवनानगर, तानाजीनगर या भागात सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरु होती. ठेकेदारांनी दिरंगाई केल्याने ही कामे अर्धवट राहिली आहेत.

कोविड 19 या संकटकाळात कामे बंद राहिली. संकटापुर्वी अपेक्षित काम का झाले नाही, याचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे आहे. अर्धवट अवस्थेत असलेली कामे अपघातास निमंत्रण देतात.

दोन दिवस झालेल्या पावसामुळे खड्डे, राडारोडा, उघड्या पडलेल्या केबल, ड्रेनेज, पावसाळी गटर नलिकांची झाकणे अर्धवट व उघडी अस्ताव्यस्त पडली आहेत. व ठिक-ठिकाणी डबकी साचली आहेत. यामुळे अपघात व साथीचे आजार होऊ शकतात.

सध्या सर्व उद्योग व्यावसाय पूर्ववत होत आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदार व अधिकारीवर्ग यांना ही कामे त्वरीत पूर्ण करण्याकरिता वेळ लागणार आहे, हे लक्षात घेऊन नागरिकांना त्रास होणार अशी तात्पुरती दुरुस्तीची कामे तातडीने करण्यात यावीत, अशी मागणी चिंचवडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.