Chinchwad : डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ – नाना पाटेकर

एमपीसी न्यूज – मन्या सुर्वे माझा भाऊ. माझ्या मामाचा मुलगा . पण मी तसा होऊ नये यासाठी आई मला गावाला घेऊन गेली, असे वक्तव्य जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. पिंपरी चिंचवड येथील कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
समीरण वाळवेकर यांनी नानांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान नानांची विविध रूपे पिंपरी चिंचवडकारांसमोर आली. सिने नाट्य क्षेत्रातील प्रवास, जीवनातील चढ उतार, नाम फाऊंडेशनची स्थापना आणि चळवळ, अनेकांच्या आठवणी आणि किस्से अशी दिलखुलास मुलाखत नानांनी पिंपरी चिंचवडच्या हजारो चाहत्यांसमोर दिली.
‘परींदा’ चित्रपटात नाना पाटेकर यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. बहुतांश चित्रपटात अतिशय गोंगाट आणि व्हायलन्स करणाऱ्या इतर खलनायकापेक्षा परींदा चित्रपटातील खलनायक नाना पाटेकर यांनी अतिशय शांत पद्धतीने साकारला आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि खलनायक याविषयी बोलत असताना त्यांना प्रत्यक्षात खऱ्या मोठ्या गुन्हेगाराला भेटलाय, बघितलंय का? असा प्रश्न विचारला. तेंव्हा नानांनी क्षणात उत्तर दिलं की, “मन्या सुर्वे माहिती आहे. तो माझा भाऊ. माझ्या मामाचा मुलगा.
माझ्या मामाकडची मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची होती. त्याच्यासारखं मी होऊ नये म्हणून माझी आई मला गावाला घेऊन गेली. तरीही ते तुमच्या शरीरात सुप्त असतंच. गुंड हे शांत असतात. मारीन म्हणत आरडाओरडा करणारे अजिबात गुंड नसतात. जो गुंड असतो तो शांत असतो. व्हायलन्स हा ओरडत नाही. जो शांत असतो तो गुपचूप मारतो. त्याची भीती वाटते. अशिक्षित माणूस गुंड झालेला परवडतो. पण सुशिक्षित माणूस गुंड झाल्यानंतर गोंधळ असतो. तो सगळा विचार करू शकतो, असं म्हणत नाना पुन्हा गॉडफादर चित्रपटातील मायकलच्या खलनायकी भूमिकेकडे वळले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.