Chinchwad : सांगवी खून प्रकरणावरून सामाजिक सलोखा बिघडवू नका; पिंपरी-चिंचवड पोलिसांचे आवाहन

Chinchwad: Don't disturb social harmony over Sangvi murder case; Appeal of Pimpri-Chinchwad Police वेगवेगळ्या सोशल मिडिया साईटवर आक्षेपार्ह मेसेज टाकले जात आहेत. यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविणा-यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

एमपीसी न्यूज – सांगवी मधील पिंपळे सौदागर येथे झालेल्या खून प्रकरणाला जातीय रंग देऊन सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सोशल मिडिया साईटवर आक्षेपार्ह मेसेज टाकले जात आहेत. यावर पिंपरी-चिंचवड पोलिसांची करडी नजर आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविणा-यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

सांगवी मधील पिंपळे सौदागर परिसरात 7 जून रोजी रात्री एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याला जखमी केले. जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत सहा जणांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियम आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यातील सहा जणांना अटक करण्यात आली असून सध्या ते आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत. या प्रकरणाचा तांत्रिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने सखोल तपास सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव करीत आहेत.

या प्रकरणाला काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय सलोखा बिघडविण्यासाठी खोडसाळपणे प्रक्षोभक, आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस व्हाटस अप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, हॅलो, टेलिग्राम व टिकटॉक व्हिडीओ अशा सोशल मिडीयावर नजर ठेऊन आहेत.

सोशल मिडियातून पसरविल्या जाणा-या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, तसेच त्याला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडविणा-यांवर पोलिसांकडून प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.