Chinchwad : डॉ. अजय चंदनवाले यांना रोटरी क्लब निगडी वोकेशनल एक्सलन्स अवार्ड प्रदान

एमपीसी न्यूज – पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता तथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबईचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले यांना रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने देण्यात येणारा रोटरी क्लब निगडी वोकेशनल एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्रदान समारंभासाठी क्लबचे अध्यक्ष विजय काळभोर, डॉ. सोमनाथ सलगर एम बी शेळके आदी उपस्थित होते.

ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना तातडीने सेवा सुविधा उपलब्ध होण्यासाठी डॉ. अजय चंदनवाले यांनी वेळोवेळी पुणे शहरातील अनेक दानशूर कंपन्या व्यक्ती व संस्थांशी अविरत संपर्क साधून 30 पेक्षा अधिक कंपन्यांकडून 126 कोटी रुपयांचा निधी देणगी आणि सीएसआर अंतर्गत मिळविला आहे. या देणगीतून ससूनला कार्पोरेट लूक देण्याचा व मध्यमवर्गीयांसाठी हक्काचे शासकीय रुग्णालय मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

या संस्थेत रुग्णांच्या सदैव मदतीसाठी व कल्याणासाठी वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक हा स्वतंत्र विभाग त्यांनी सुरू करून अनेक गोरगरीब रुग्णांना त्याचा लाभ मिळवून दिला आहे. ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात नाविन्यपूर्ण झाली आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 16 मूत्रपिंड प्रत्यारोपण व तीन यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत. ससून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांसाठी 1 हजार 296 खाटा उपलब्ध आहेत. या रुग्णालयात संपूर्ण महाराष्ट्रातून रोग निदान व उपचारासाठी रुग्ण येत असतात. येथे ट्रॉमा केअर सेंटर, मणक्याची शस्त्रक्रिया, खुब्याच्या शस्त्रक्रिया आणि सांध्याची रोपण शस्त्रक्रिया, ऍन्जिओग्राफी, ॲन्जिओप्लास्टी, अत्याधुनिक कॅथलॅब, डायलेसिस इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.

त्याचबरोबर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय परिसरात दैनंदिन स्वच्छता पाहण्यासाठी संस्थेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत तसेच पुणे येथील निरंकारी सेवाभावी संस्था यांच्यामार्फत वेळोवेळी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छ ससून प्रसन्न असून ही मोहीम राबविण्यात आली आहे.

पुरस्काराला उत्तर देताना डाॅ. अजय चंदनवाले म्हणाले, ससून सर्वोपचार रुग्णालय हे गोरगरीब रुग्णांचे आशास्थान आहे. मी ससून रुग्णालयाचा कायापालट करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून 13 मे 2011 रोजी रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदावर रुजू झालो. प्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या सहकार्याने किचनचे नूतनीकरण करून ते अत्याधुनिक व सर्व सोयींनीयुक्त तयार केले.

तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या सर्व रुग्णांना दररोज मोफत नाष्टा व दोन वेळचे जेवण हे मागील सात वर्षांपासून देण्यात येत आहे. तसेच ससूनमधील विविध कक्षांचे नूतनीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. ससूनमध्ये मातांनी दान केलेल्या दुधातून मातृदुग्ध पेढी सुरू करण्यात आली आहे. तसेच ससूनमध्ये मुकुल माधव फाउंडेशन यांच्या देणगीतून 59 घाटांचा नवजात अतिदक्षता कक्ष सुरू करण्यात आला आहे. सिटीस्कॅनसह हायटेक कॅज्यूल्टी सुरू करण्यात आली. एकाच छताखाली बाह्यरुग्ण विभागाचे नुतनीकरण व नातेवाईकांसाठी निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.