Chinchwad : बदलत्या तंत्रज्ञानानुसार शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांपर्यंत गेली पाहिजे – डॉ. वरदराज बापट

एमपीसी न्यूज : कमला एज्युकेशन सोसायटीज् संचलित प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या (Chinchwad) वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय स्तरावर चर्चासत्र कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी (इंडस्ट्री इन्स्टिट्युट लिंकेज)’ अंतर्गत कृती, योजना, भारतीय शिक्षणावरील प्रभाव, सध्याच्या औद्योगिक पद्धती आणि तांत्रिकमध्ये एकत्रीकरण, खाजगी व परदेश प्रवेशी पद्धती, भारतीय कॅम्पसमधील विद्यापीठे, राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी व आव्हाने, प्रभावी अंमलबजावणीमध्ये तंत्रज्ञान आणि अद्यापनशास्त्र यांचे एकत्रीकरण, अशिक्षीत व शिक्षीत पदवीधरांना रोजगारांच्या संधी, समग्र शिक्षणाचा मार्ग, अभिनव दृष्टीकोन आदी विषयावर राष्ट्रीय पातळीवरील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

त्याचे उद्घाटन मुंबईच्या आय.आय.टी. चे डॉ. वरदराज बापट यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कमला एज्युकेशन सोसायटीज्चे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, साई बालाजी गु्रप ऑफ इन्स्टिट्युटचे संचालक डॉ. विलास कुलकर्णी, अजिंक्य डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. विजय कुलकर्णी, राधेशाम वेलपॅक्स कंपनीचे संचालक विजय पंजाबी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (महाराष्ट्र शासन)चे सदस्य डॉ. देविदास गोल्हर, प्रतिभा इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे संचालक व चर्चासत्र कार्यशाळेचे अध्यक्ष डॉ. सचिन बोरगावे, कार्यशाळेचे मुख्य समन्वयक प्रा. गुरुराज डांगरे, प्रा. मनिष पाटणकर समवेत उद्योग, शिक्षण क्षेत्रातील तज्ञ, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन सोहळ्यात डॉ. वरदराज बापट पुढे म्हणाले, देशातील शालेय आणि उच्च शिक्षण प्रणालीतील परिवर्तनात्मक सुधारणेला वाव देणार्‍या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला मंजूरी मिळाली आहे. परिवर्तन घडविण्याचा आणि विद्यार्थ्यांच्या अंगिभूत क्षमता, कलागुणांचा विकास व्हावा, हा धोरणाचा उद्देश आहे.

नवीन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांनी मनापासून आत्मसात केली पाहिजे. शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्वाचा विकास महत्वाचा आहे. ते सामूहीक प्रयत्नातूनच शक्य होणार आहे. रट्टापद्धती आता काळानुसार कालबाह्य झाली पाहिजे. दैनंदिन कामकाजात सुसुत्रता आणली गेली पाहिजे. हे करीत असताना संवेदनशीलता महत्वाची आहे. तो त्याचे बघून घेईल, ही विचारसरणी घातक आहे.

समस्यांचे निराकरण (Chinchwad) वेळीच झाले पाहिजे. उच्च शिक्षणासाठी नाविण्याचा ध्यास प्रत्येकाने अंगिकारला पाहिजे. शोध प्रणाली महत्वाची आहे. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा नवीन सुटसुटीत प्रणाली प्रचलित झाली पाहिजे. आज तंत्रज्ञान बदलत आहे. विज्ञान क्षेत्रात नवीन शोध लागत आहे. सामाजिक शास्त्रातून भेडसावणार्‍या समस्यांचे अचूक निराकरण झाले पाहीजे, ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचले पाहीजे.

मातृभाषेबरोबरच इतर भाषेवर प्रभुत्व मिळविले पाहीजे. प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे, हे हेरून त्याला त्या क्षेत्रात प्राधान्य दिले पाहीजे तरच, प्रगती होऊ शकते. कोणतीही व्यक्ति अयोग्य नाही, त्याला प्रोत्साहनाची गरज आहे. उद्योग क्षेत्रांना काय हवे आहे, त्याला अनुसरून शिक्षण दिले गेले पाहीजे. आज 70 टक्के लोक स्वतःच्या उपजिविकेसाठी मोलमजूरी ते छोटा व्यवसाय करीत आहे.

त्यात अशिक्षीत, शिक्षीत, बेरोजगार आदींचा समावेश आहे. शिक्षीत नोकरीच्या मागे जात आहे, त्यांनी स्वताच व्यवसाय सुरू करून इतरांना नोकरी देण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन करून या बदलाला थोडा काळ लागेल, पण बदलाची सुरुवात महत्त्वाची आहे.

प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, पुणे शिक्षणाचे माहेर घर आहे, तर पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक क्षेत्र आहे. आज शिक्षणाला पर्याय नाही, महागडे शिक्षण देखील सर्वांना परवडणारे नाही, त्यामुळे अनेक शाखेतील जागा शिल्लक राहतात.

सरासरी आज 100 पैकी फक्त 27 विद्यार्थीच उच्च शिक्षण घेत आहे, आव्हाने भरपूर असली तरी ऑनलाईन, डिजीटल शिक्षण प्रणाली सुरु करण्यात आली आहे. नवीन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षकांना आपले काय होणार, याची चिंता देखील त्यांना सतावत आहे.

अशातच 25 ते 30 टक्के विद्यार्थ्यांची गळती होत आहे. त्यात घरगुती समस्या, मुलींचे लग्ने, वाय.डी., आर्थिक चणचण, बेरोजगारी अनेक कारणे असली तरी कागदी बुद्धीमत्ता महत्वाची नाही. व्यवसायात व व्यवहारात आपल्या ज्ञानाचा वापर कसा करायचा याचे ज्ञान आज अनेक शिक्षीत विद्यार्थ्यांना नाही.

वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना उद्योग समुहात कामकाज कसे होते याचे ज्ञान शिक्षण संस्थांनी पदवी पूर्ण करतानाच देण्याची काळाची गरज आहे. उद्योग समुहाच्या अपेक्षापूर्ती हव्या त्या प्रमाणात होताना दिसत नाही. त्यासाठी कठीण परिश्रमाची आवश्यकता आहे. शिक्षकांनी देखील सखोल ज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षण संस्था चालकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

विद्यार्थ्यांसाठी नवीन सॉफ्टवेअरही उपलब्ध करून दिले गेले पाहिजे. तंत्रशिक्षण व वाणिज्य क्षेत्रातील शिक्षण संस्थांच्या संस्थाचालकांनी एकत्रीत उपक्रमे राबविली पाहीजेत.

कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा म्हणाले, आज अनेक ठिकाणी इ.5 वी ते इ.8 वी तील विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहीता वाचता येत नाही. शालेय स्तरावर कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात शिक्षण प्रणाली वेगवेगळी आहे. त्यातच सी.बी.एस.सी. चा अभ्यासक्रम इतर अभ्यासक्रमापेक्षा जास्त आहे, अशी तक्रारही आहे. यासाठीच सरकारने ‘एक भारत, एक शिक्षण’ प्रणाली आणू पाहत आहे. विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून ते शालेय स्तरापासूनच हुशार असणे काळाचीच गरज असून त्यासाठी शिक्षक, प्राध्यापकांना त्यांची जबाबदारी देखील टाळता येणार नाही. विद्यार्थ्यांची आवड वेळीच लक्षात आली तर, चांगल्या पद्धतीने पुढे जाता येईल.

समारोपाच्या दुसर्‍या दिवसाच्या चर्चासत्रात, भारती विद्यापीठाचे संचालक डॉ. सचिन कदम, कर्नाटकमधील विश्वेश्वरच्या तंत्रज्ञान विद्यापीठातील डॉ. बसवेराज कुडचीमठ, पुणे येथील एम.के.सी.एल. चे संचालक डॉ. अनंत सरदेशमुख, प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकिय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.

दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात उपस्थितीत मान्यवरांचे स्मृतीचिन्ह स्वरुपात सत्कार चर्चासत्राचे अध्यक्ष व संचालक डॉ. सचिन बोरगावे तसेच, संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्य समन्वय प्रा.गुरुराज डांगरे यांनी केली. उपस्थित पाहुण्यांची ओळख, सूत्रसंचालन व आभार डॉ. महिमा सिंग, डॉ. पल्लवी चूग, डॉ. निजी साजन यांनी मानले. संयोजनासाठी विशेष परिश्रम प्रा. सुरभी रोडी, प्रा. मनीष पाटणकर, डॉ. श्वेता जैन, प्रा. कविता दिवेकर, प्रा. प्रिया माथुरकर, प्रा. रजनिश मिश्रा आदींनी केले.

Baramati News : 70 दिवसांत बारामती परिमंडलाने बदलले 3240 रोहित्र


 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.