Chinchwad :नारळाच्या झाडावर पडली वीज; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

एमपीसी न्यूज – चिंचवडमधील तानाजी नगर येथे नारळाच्या झाडावर वीज पडली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी तीनच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात सकाळपासून वातावरण निरभ्र होते. अचानक दुपारी तीनच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली. पावसासोबत विजांचा कडकडाट झाला. जोरजोरात झालेल्या विजेच्या कडकडाटामुळे पिंपरी-चिंचवडकर भयभीत झाले. चिंचवडमधील तानाजी नगर येथे एका घरासमोर असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडली.

वीज पडलेल्या नारळाच्या झाडाने क्षणात पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील नागरिकांनी आडोसा धरल्यामुळे हे संकट टळले असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.